नागपुरातील गोरेवाड्यात मार्चपर्यंत ‘इंडियन सफारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:17 AM2020-01-10T10:17:23+5:302020-01-10T10:17:50+5:30
आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच येथे प्राणीही जाळीबंद पिंजऱ्यात सोडले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच येथे प्राणीही जाळीबंद पिंजऱ्यात सोडले जाणार आहेत. २ वाघ, ७ बिबटे, ६ अस्वल आणि १४ नीलगायी येथे सोडण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरध्ये उपचारानंतर हे सर्व प्राणी तंदुरुस्त झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वन्य प्राण्यांना येत्या १० ते १५ दिवसात रेस्क्यू सेंटरमधून प्रस्तावित इंडियन सफारीच्या वन क्षेत्रात स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर मार्च महिन्यात याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रालय स्तरावरून गोरेवाडाचे व्यवस्थापन पाहण्याºया वन विकास महामंडळाला हे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षभरापासून हे काम प्रलंबित होते. गोरेवाडा येथे वन्यप्राणी बचाव सेंटरच्या निर्मिसोबतच नेचर ट्रेल तयार झाल्यानंतर डावीकडे गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वन क्षेत्रात सफारी सुरू करण्यात आली होती.
मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात जंगल सफारी, इंडियन सफारी, नाईट सफारी आणि आफ्रिकन सफारी आदीसाठी नव्या सुधारित प्रस्तावानुसार ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता होती. हा आकडा मोठा असल्याने इंडियन सफारी व अन्य प्रकल्पांसाठी पब्लिक प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) नुसार हा प्रकल्प विकसित करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. जानेवारीमध्ये मुंबईच्या ‘एस्सेल वर्ल्ड’च्या चमूलाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याशी करार करून जॉर्इंट व्हेंचर कंपनी तयार करून काम सुरू करण्यात आले होते.
‘वॉकिंग ट्रेल’ तयार होणार
आता इंडियन सफारीसोबतच गोरेवाडामध्ये ‘वॉकिंग ट्रेल’ तयार केली जाणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या संदर्भात अंतिम रूप देण्यासाठी मंत्रालयस्तरावर चर्चा सुरू आहे.