संस्मरणीय ठरली इंडियन सायन्स काँग्रेस; विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 08:43 PM2023-01-07T20:43:46+5:302023-01-07T20:44:14+5:30
Nagpur News नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही सायन्स काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षात १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी ही विद्यापीठासाठी अनोखी भेट ठरली.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला. पाच दिवसांत एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींनी याला भेट दिली. यात विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही सायन्स काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षात १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी ही विद्यापीठासाठी अनोखी भेट ठरली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. पाच दिवसात यात २७ परिसंवाद, चिल्ड्रन, वूमन, सायन्स काँग्रेसचा समावेश होता. यंदा प्रथमच आदिवासी सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या सायन्स काँग्रेसला विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी समारोपाला कानपूरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॉ. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला.
प्राइड इंडिया एक्स्पो’ विशेष आकर्षण
प्राइड इंडिया एक्स्पो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्स्पोमध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. यासोबतच चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये शाळकरी मुलांच्या विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले होते.