भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 06:46 AM2023-01-04T06:46:28+5:302023-01-04T06:46:46+5:30

१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Indian Scientists' Guide to the Research World: Prime Minister Narendra Modi | भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

नागपूर : भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात होत आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. विज्ञान क्षेत्रात पुढाकार घेणारेच इतिहास रचत असतात. त्यामुळे देशातील संशोधकांनी तरुणांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी 
यावेळी केले. 
१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी होते.
पंतप्रधान म्हणाले, विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. स्टार्टअपच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. २०१५ पर्यंत १३० देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावर होता, तर २०२२ मध्ये भारताने ४० व्या स्थानावर झेप घेतली आहे.  येत्या २५ वर्षांत भारत विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात देशाने अंतरीक्ष क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशात ३८६ विदेशी सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. यापैकी ३५१ सॅटेलाईट हे मोदी यांच्या कार्यकाळात सोडण्यात आले. अमेरिकेलाही भारत मदत करीत आहे.

इस्रोची ‘स्पेस ऑन व्हील्स’
अमेरिकेच्या ‘नासा’प्रमाणेच भारताच्या इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. तिची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही बस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

तंत्रज्ञानाने सर्वांना संधी 
विज्ञान-तंत्रज्ञान कधीही भेदभाव करीत नाही. तो सर्वांना संधी देतो. आपल्या संसाधनांचा गरजेइतकाच वापर करायला हवा. येणाऱ्या पिढीसाठी संसाधने शिल्लक ठेवायला हवीत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

वैज्ञानिक हे आधुनिक ऋषी-मुनी  
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आजचे वैज्ञानिक हे ऋषी-मुनी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या काळात पंतप्रधानांच्या आवाहनावर जगाने योग स्वीकारला.

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा दबदबा  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात महिला सशक्तपणे सहभाग नोंदवून आपला ठसा उमटवत आहेत. दबदबा निर्माण करीत आहेत. त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरत आहे. बाल विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून मुलांच्या आकांक्षांना प्रोत्साहन मिळाले. 
ग्रामीण भागातील जीडीपी वाढावी  
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आदिवासीबहुल
भाग व ग्रामीण भागातील
जीडीपी वाढायला हवी.
यामुळे देश आत्मनिर्भर
होईल आणि आपण पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी करू शकू.

Web Title: Indian Scientists' Guide to the Research World: Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.