भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी

By admin | Published: September 17, 2016 03:22 AM2016-09-17T03:22:40+5:302016-09-17T03:22:40+5:30

वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला.

Indian soil gives message of equality | भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी

भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी

Next

टॉम अल्टर : ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ विषयावर व्याख्यान
नागपूर : वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला. परंतु पुढे आईवडिलांनी भारतात परतण्याचा निर्णय घेऊन ते माझ्या मोठ्या बहिणीसह भारतात परतले. लहानपणापासून मी स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकेतील शिकागो येथील परिषदेतील भाषणामुळे प्रभावीत झालो. त्यांच्याच भूमीत माझा जन्म व्हावा यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नसून भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील चित्रपट कलावंत पद्मश्री टॉम अल्टर यांनी आज येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेत ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, मस्जिद पारेख यांची उपस्थिती होती.
टॉम अल्टर म्हणाले, लहानपणापासून माझ्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा पगडा आहे. अमेरीकेतील शिकागो येथील त्यांच्या भाषणाला माझ्या आईचे आजोबा उपस्थित होते. त्यामुळे आईला ते नेहमी स्वामी विवेकानंदांच्या आठवणी सांगत. स्वामी विवेकानंदांच्या भूमीत माझा जन्म व्हावा हे माझे भाग्य आहे. भारताची भूमी ही सर्वसमावेशक आहे. येथे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान स्थान आहे. भारताच्या भूमीने सर्वांना वारसाने खूप काही दिले आहे. ते कसे जोपासावे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वडील उर्दु भाषेत बायबलचे वाचन करीत असल्यामुळे उर्दु भाषा शिकायला मिळाली. संसदेने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केल्यानंतर हिंदी भाषाही शिकल्याचे त्यांनी सांगून भारतीय असल्याची जबाबदारी प्रत्येकाने मिळून पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. मस्जिद पारेख म्हणाले, समाजातील जबाबदार व्यक्तीच समाजातील वाईट स्थितीस कारणीभूत आहेत.
सर्व धर्म त्यांच्या धर्मग्रंथांना सोडून अंधश्रद्धा, वाईट गोष्टींच्या मागे लागल्यामुळे जातीय तेढ वाढत असून धार्मिक भावना दूर ठेवून मानवतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भारतात अनेक प्रकारची विविधता असूनही सर्वजण एकत्र राहून एकतेचा परिचय देत असल्याचे सांगितले. यावेळी उदय चंद्र यांनी शिकागो परिषदेतील स्वामी विवेकानंदांचे भाषण सादर केले. संचालन प्रमोद शर्मा यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)

घंटी, अजान आणि प्रार्थनेची जुगलबंदी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टॉम अल्टर आणि त्यांचे मित्र उदय चंद्रा यांनी भारतभूमीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण कसे आहे याचे एक उत्तम उदाहरण सादर केले. टॉम अल्टर यांच्या वडिलांनी १९५४ मध्ये राजपूरमध्ये एक आश्रम स्थापन केला होता. या आश्रमाच्या परिसरात मंदिर, मशीद खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे घंटी, अजान यांचे आवाज खूप ऐकू येत. त्यावर त्यांनी तेथील वातावरण कसे होते याचे सादरीकरण केले. उदय चंद्रा यांनी कुराणातील अजान सादर केल्या, तर टॉम अल्टर यांनी गिरजाघरातील प्रार्थना आणि सोबतच मंदिरातील घंटी वाजवून मंदिर, मशीद आणि गिरजाघर एकाच ठिकाणी असल्याचा भास घडविला. या उदाहरणानंतर अशा प्रकारचे ध्वनी जगात केवळ भारतातच ऐकावयास मिळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Indian soil gives message of equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.