भारतीयांचे हृदय २० टक्क्यांनी लहान; डॉ. सेनगुप्ता यांचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 11:36 AM2020-11-02T11:36:06+5:302020-11-02T11:55:16+5:30

Health Heart Nagpur News भारतीयांचे हृदय पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी लहान असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Indians' hearts are 20 percent smaller; Dr. Sengupta's study | भारतीयांचे हृदय २० टक्क्यांनी लहान; डॉ. सेनगुप्ता यांचा अभ्यास

भारतीयांचे हृदय २० टक्क्यांनी लहान; डॉ. सेनगुप्ता यांचा अभ्यास

Next
ठळक मुद्देहृदयावरील उपचाराचे निकष बदलले

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पाश्चिमात्य देशाचा अभ्यासानुसार भारतातील हृदयविकारांवर उपचार केले जातात. परंतु भारतीयांचे हृदय पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी लहान असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे हृदयावरील उपचाराचे निकष गरजेनुसार बदलणे आवश्यक आहेत, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शांतनु सेनगुप्ता यांनी आपल्या अभ्यासातून दिली.

डॉ. सेनगुप्ता यांच्या नेतृत्वातील हे संशोधन नुकतेच अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग’मध्ये प्रकाशित झाले आहे. मागील चार वर्षांपासून देशातील सहा विविध केंद्रांवर यांचा अभ्यास करण्यात आला होता. यात एक हजार व्यक्तीच्या हृदयाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आला. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. सेनगुप्ता म्हणाले, हे संशोधन नागपुरातील सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, गुरुग्राम येथील वेदांता, दिल्ली येथील फोर्टिस हॉस्पिटल, कोलकाता येथील रवींद्रनाथ टागोर हॉस्पिटल, इंदोर येथील सीएचएल हॉस्पिटल येथे झाले. या सहा केंद्रांत आलेल्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. यात सर्वाधिक ४०० रुग्ण नागपुरातील होते.

पुरुषाचे हृदय ३०० तर महिलांचे हृदय २५० ग्रॅम

डॉ. सेनगुप्ता म्हणाले, संशोधनात इको, ईसीजी आदी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय व्यक्तींच्या हृदयाची उंची, रुंदी व आकारासह वजनाचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतीयांचे हृदय आकार आणि वजनाने १५ ते २० टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. पाश्चिमात्य देशातील पुरुषाचे हृदय ३०० ते ३५० ग्रॅम, महिलांचे २५० ते २८० ग्रॅम आहे. तर भारतातील पुरुषाचे हृदय ३०० तर महिलांचे हृदय २५० ग्रॅम इतके असल्याचे दिसून आले.

हृदयावर पहिल्यांदाच असे संशोधन 

पाश्चिमात्य देशाच्या अभ्यासाच्या आधारावर भारतात उपचार केले जातात. परंतु देशात प्रथमच झालेल्या या अभ्यासामुळे ‘नॉर्मल’ हृदयाचे निकष बदलले आहे. यात आणखी पुढे संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनात ठाण्याचे डॉ. नितीन बुरकुळे, गुरुग्रामचे डॉ. मनीष बंसल, नवीन दिल्लीचे डॉ. जे. सी. मोहन, इंदोरचे डॉ. अतुल करांडे, कोलकाताचे डॉ. देबिका चॅटर्जी आदींचा सहभाग होता.

डॉ. शांतनु सेनगुप्ता

हृदयरोग तज्ज्ञ, नागपूर

Web Title: Indians' hearts are 20 percent smaller; Dr. Sengupta's study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य