कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:39 PM2019-07-17T21:39:49+5:302019-07-17T21:40:58+5:30
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. विधिज्ञांनी हा भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एप्रिल-२०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी व दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिलासा दिला.
भारताचे दावे खरे ठरले
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने मांडलेले कायदेविषयक मुद्दे खरे ठरले. जाधव यांना अटक करताना व त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी १५ न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. कायद्याच्या बाबतीत हा भारताचा फार मोठा विजय आहे.
वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल
पाकिस्तानचा खरा चेहरा उघड
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आला. पाकिस्तान नेहमीच मानवाधिकरांचे उल्लंघन करतो हे स्पष्ट झाले. जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते. त्यांनी जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची संधीही दिली नव्हती. त्यामुळे जाधव यांना स्वत:चा बचाव करता आला नाही. आता जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य मिळू शकेल.
अॅड. फिरदोस मिर्झा
व्हिएन्ना कराराचे उल्लंघन सिद्ध
जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. जाधव हे भारताचे हेर नसतानाही पाकिस्तानने त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याविरुद्ध खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात पाकिस्तान मानवाधिकार विसरून शत्रुत्वाच्या भावनेने वागला.
अॅड. शशिभूषण वहाणे
भारताचा मोठा विजय झाला
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यामुळे भारताने मोठी लढाई जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी तब्बल १५ न्यायमूर्तींनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांच्यावर अन्याय केल्याचे सर्व जगाला कळले आहे. यापुढे पाकिस्तानला सांभाळून वागावे लागेल.
अॅड. राजेंद्र डागा