भारतातील पहिली ट्रान्सवुमन नर्स; मायरा गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 07:00 AM2019-04-21T07:00:00+5:302019-04-21T07:00:02+5:30
मायरा गुप्ता. भारतातील पहिली ट्रान्सवुमन वर्किंग स्टाफ नर्स. शिक्षणाने प्रगतीची महाद्वारे खुली होतात याचं अलिकडचं ताजं उदाहरण.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
जी सध्या हैदराबादमधील एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये आॅपरेशन थिएटरमधील तांत्रिक सहकर्मी म्हणून जबाबदारी सांभाळते आहे.
मूळची नागपूरची असलेली मायरा गेल्या काही महिन्यांपूर्वी कायदेशीररित्या मायरा आर. गुप्ता झाली आहे. त्याआधी ती विक्रम रामचंद्र गुप्ता होती. बहुतांश तृतीयपंथियांच्या वाट्याला येतात ते बरेवाईट, कडू अनुभव तिनेही पाहिले आहेत. पण मायराच्या बाबतीत एक वेगळेपण अजून होतं. या वेगळेपणाने तिला इतर तृतीयपंथियांपासून वेगळ््या स्थानावर नेऊन ठेवलं. तो म्हणजे तिचा सेवाभावी स्वभाव आणि शिक्षणाची आवड. दुसरं म्हणजे तिची आई तिच्या पाठिशी भक्कमपणे उभी होती. तुला जे आवडतं ते काम तू कर असा आईचा तिला सल्ला होता. दरम्यानच्या काळात तिने विक्रम ते मायरा हा प्रवासही पूर्ण केला होता.
बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न होता. तिने मग सी.पी. अॅन्ड बेरार महाविद्यालयात मानसशास्त्रात बी.ए. केलं. ते झाल्यावर घरचे, जवळपासचे आणि मित्रमंडळ यांना सदैव मदतीला तयार असलेली, आजारी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणारी मायरा साहजिकच वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. आॅरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला लागली. तिथे एक वर्षाचा आॅपरेशन थिएटर टेक्निकल असिस्टंट हा कोर्स केला. हॉस्पीटलमध्ये तिथे आपल्या कार्यशैलीने तिने सर्वांवर चांगली छाप उमटविली. तिच्या या गुणवैशिष्ट्याला हेरून वरिष्ठांनी तिला नर्सिंगचा कोर्स करण्याचा सल्ला दिला आणि मायरा त्यासाठी बंगरुळूला रवाना झाली. तीन वर्षांचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून २०१८ मध्ये मायरा तेथीलच एका हॉस्पीटलमध्ये रुजू झाली. तिला अलीकडेच हैदराबाद येथील एका मोठ्या रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. राहण्यासाठी रुग्णालयाने एक सदनिकाही दिली आहे आणि तिच्या जाण्यायेण्यासाठी वाहनव्यवस्थाही करून दिली आहे.
नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक दोन ट्रान्सवुमन्स देशात आहेत पण त्या नोकरी करत नाहीयेत असं मायरा सांगते. याअर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवुमन नर्स झाली आहे. नर्सिंगच्या क्षेत्रात काम करताना आपण अतिशय समाधानी व आनंदी आहोत, असे मायराचे सांगणे आहे. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ज्या क्षेत्रात आदर, सेवाभाव आणि मित्रता आहे तिथे काम करणे हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
माझं व्यक्तिगत आयुष्य किंवा ट्रान्सवुमन असणं आणि प्रोफेशनल क्षेत्र याची सरमिसळ मी करत नाही. जेव्हा मी काम करत असते तेव्हा मी फक्त तेथील एक जबाबदार नर्स असते. ट्रान्सजेंडरचे आयुष्य म्हणजे केवळ टाळ््या वाजवणे, गाणी म्हणणे एवढेच मर्यादित राहिलेले नाही, जग बदलले आहे, समाजही बदलतो आहे. त्यामुळे आपणही बदलले पाहिजे. नव्या जगाच्या नव्या वाटांवरून वाटचाल करायला पाहिजे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे. त्याची पूर्ती व्हावी अशी मायराला लोकमततर्फे शुभेच्छा!