देशाचे नवे शैक्षणिक धोरण लवकरच; सत्यपाल सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:44 AM2018-03-23T11:44:55+5:302018-03-23T11:45:08+5:30
शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सध्याच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर काम सुरू आहे. नवीन धोरण तयार करण्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.
सेंट्रल इंडिया ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे गांधीसागर महाल येथील रजवाडा पॅलेस येथे आयोजित एक दिवसीय सेमिनारच्या समारोपपसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंंत्री व संस्थेचे अध्यक्ष अनिस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ आर. विमला, नगरसेवक जुल्फीकार भुट्टो आणि अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, शिक्षणाचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे मुलांचा समग्र विकास होय. त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचे वातावरण बदलेल. मुलांना मूल्यात्मक शिक्षण शिकवण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात यासर्व गोष्टींचा समावेश करण्याचा विचार आहे. यासोबतच स्थानिक भाषेला मजबूत करणे, देशातील शैक्षणिक सुविधा वाढवणे, गरीब मुलही शिकू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करणे, अकाऊंटिबिलीटी वाढवणे , स्कील मॅन पॉवर तयार करणे याशिवाय नवीन अत्याधुनिक शिक्षणावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनिस अहमद यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. अब्दुल आहत यांनी केले. इकरा खान यांनी आभार मानले.
फार्मसीच्या अभ्यासक्रमात असावी सर्व पॅथीच्या औषधांची माहिती
फार्मसीच्या अभ्यासक्रमात अॅलोपॅथीसोबतच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी औषधांंच्या माहितीचाही समावेश व्हावा. याबाबत आपण मंत्रालयातील अधिकाºयांनाही सूचना करणार असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.
देशभरातील तरुण अभियंत्यांशी साधणार संवाद
येत्या ३० मार्च रोजी देशभरातील तरुण अभियंत्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात देशातील १ लाख अभियंते सहभागी होणार आहेत. ते देशातील सध्याची समस्या व त्यावर उपाय सुचवणार आहेत.
नवीन धोरणात आरएसएसच्या प्रस्तावाचीही दखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत बोली व मातृभाषेच्या संरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. संघाच्या या प्रस्तावाची दखल नवीन शैक्षणिक धोरणात घेण्यात येणार असल्याचे डॉ. सत्यपाल सिंग यांनी यावेळी मान्य केले. भारतीय भाषा आणि मातृभाषेवर जोर दिला जाईल, असे स्पष्ट करीत भारतातील प्राचीन परंपरा, संस्कृती, ज्ञान टिकवून ठेवणे आणि जीवन मूल्यावरही नवीन धोरणात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.