चीनला पर्याय होण्याची भारतात क्षमता : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:48 PM2020-04-13T23:48:54+5:302020-04-13T23:50:18+5:30
जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. जपान, अमेरिकेसारखे देश चीनमधील त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याच्या विचारात आहेत. इतरही देश असे पाऊल उचलू शकतात. अशास्थितीत जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोमवारी सायंकाळी भारतीय शिक्षण मंडळाच्या ‘फेसबुक पेज’वर गडकरी यांनी ‘कोरोनानंतरच्या औद्योगिक संधी व आव्हाने’ या विषयावर भाष्य केले.
‘कोरोना’मुळे युरोप, अमेरिकेत तर चिंताजनक स्थिती आहे. या देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती नियंत्रणात आहे. परंतु अद्याप संकट संपलेले नाही. या संकटाचा काही दिवस सामना करावा लागेल. येत्या महिनाभरात स्थिती नक्कीच सुधारेल, हा विश्वास आहे. ‘कोरोना’च्या संकटाचा दोन भागात विचार करायला हवा. केंद्र शासनाने जारी केलेल्या नव्या धोरणांमुळे औषधांचा कच्चा माल चीनकडून मागविण्याची आवश्यकता राहणार नाही. आपल्याकडेच त्याचे उत्पादन होऊ शकेल. शिवाय देशात चार वैद्यकीय उपकरणांचे ‘पार्क’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे ही उपकरणे देशातच बनू शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना’नंतर काय, यासंदर्भात आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. जगाला विविध गोष्टींचे निर्यात करणारा भारत ‘हब’ बनू शकतो. या माध्यमातून आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊ शकते व निर्यात वाढू शकते. यासाठी भविष्याला डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगक्षेत्रातील आव्हाने यावर भर देण्याची गरज आहे, असे गडकरी यांनी सांगितले.