कोरोना काळात भारताची वैज्ञानिक ताकद जगासमोर आली; डॉ. माशेलकर यांनी मांडले मत
By मंगेश व्यवहारे | Published: March 18, 2023 07:44 PM2023-03-18T19:44:02+5:302023-03-18T19:45:20+5:30
Nagpur News २०२० हे वर्ष महामारीचे वर्ष म्हणून ओळखले जाते. पण माझ्या मते ते महामारीचे वर्ष नव्हते तर विज्ञानाचे वर्ष होते, असे मत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
नागपूर : २०२० हे वर्ष महामारीचे वर्ष म्हणून ओळखले जाते. पण माझ्या मते ते महामारीचे वर्ष नव्हते तर विज्ञानाचे वर्ष होते. यावर्षी खऱ्या अर्थाने नागरिकांना विज्ञान व संशोधनाचे महत्त्व पटले आणि संशोधनातील गुंतवणूक किती महत्त्वाची आहे, हेही अधोरेखित झाले. यावर्षीच जगाला भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिकांची ताकद कळली, असे मत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. वानाडोंगरी स्थित दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीने प्रतिष्ठित संशोधन पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दादासाहेब काळमेघ यांच्या ९० व्या जयंतीनिमित्ताने तसेच दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आणि प्रतिष्ठानद्वारा संचालित दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या १६ व्या स्थापना वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठित संशोधन पुरस्काराचा वितरण सोहळा महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. या समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आयसीटी, मुंबईचे माजी संचालक पद्मविभूषण डॉ. एम. एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याला बडवे इंजिनिअरिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांच्यासह आयसीटी, मुंबईचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे पदव्युत्तर शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा, राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, अनिरुद्ध पंडित तसेच दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ, हेमंत काळमेघ उपस्थित होते. शैक्षणिक दर्जा आणि संशोधनाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयाने गेल्या चार वर्षांपासून ‘संशोधन पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू केली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात ‘पद्मभूषण डॉ. आर. अहमद संशोधन पुरस्कारा’ने डॉ. अंबर राऊत व डॉ. प्रिया मित्तल यांना पुरस्कृत करण्यात आले. ‘पद्मविभूषण डॉ. एम. एम. शर्मा संशोधन पुरस्कारा’ने जान्हवी चारेगावकर, दृष्टी महतो व स्नेहल येरणे यांना पुरस्कृत करण्यात आले. ‘पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर संशोधन पुरस्कारा’ने डॉ. विक्रांत जाधव यांना पुरस्कृत करण्यात आले. ‘डॉ. जी. बी. शंकवलकर संशोधन पुरस्कारा’ने डॉ. वैदेही आवारी व ‘पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव पुरस्कारा’ने डॉ. विवेकानंद कट्टीमनी यांना पुरस्कृत करण्यात आले. या समारंभात ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद काळमेघ यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत अधिष्ठाता डॉ. दीपक नागपाल यांनी केले.