भारताचा अंतराळ कार्यक्रम समाज विकासासाठी
By admin | Published: May 14, 2016 03:02 AM2016-05-14T03:02:40+5:302016-05-14T03:02:40+5:30
जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात.
राष्ट्रीय तंत्रज्ञानदिन : एसव्हीसी कामेश्वर राव यांचे प्रतिपादन
नागपूर : जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात. परंतु भारतातील अंतराळ कार्यक्रम हा जगापेक्षा वेगळा आहे. भारतातील इस्रोमार्फत राबविण्यात येत असलेला अंतराळ कार्यक्रम हा पूर्णपणे समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यचे (इस्रो) मध्यचे महाव्यवस्थापक डॉ. एस.व्ही.सी. कामेश्वर राव यांनी येथे केले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त बुधवारी नीरीतर्फे ‘भारतीय अंतराळ कार्यक्रम’ या विषयावर नीरी सभागृह येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नीरीचे कार्यकारी निदेशक डॉ. तपस नंदी होते. डॉ. कामेश्वर राव हणाले, डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. भारताचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम हा मानव विकासाला केंद्रबिंदू ठरवूनच राहिलेला आहे. गेल्या ४० वर्षांत भारतीय अंतराळ कार्यक्रमाने सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय राष्ट्रीय उपग्रहा(इन्सॅट)ने दूरदर्शन प्रसारण व हवामान सेवा उपलब्ध केली जाते; तर भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे नैसर्गिक संसाधने, कृषी क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापनाची सेवा दिली जाते. एकूणच कनेक्टिव्हीटी, कम्युनिकेशन, गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, कृषी, वन, पर्यावरण, पाणी आदींच्या उपयोगासाठी याचा वापर केला जातो. या सर्वांचा मुख्य केंद्रबिंदू मानवाचा विकास हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राव यांनी यावेळी इस्रोचा संपूर्ण कार्यक्रम प्रेझेंटेशनद्वरे समजावून सांगितला.
डॉ. तपस नंदी यांनी स्वागतपर भाषण करीत डॉ. राव यांचा परिचय करून दिला. जया सब्जीवाले यांनी संचालन केले. डॉ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)