नागपूर- सिंगापूर थेट विमान सेवेचे संकेत; विमान वाहतूक मंत्र्यांचं सूचक पत्र

By कमलेश वानखेडे | Published: February 2, 2024 06:33 PM2024-02-02T18:33:42+5:302024-02-02T18:33:46+5:30

गडकरींच्या मागणीवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमान कंपन्यांना केले अवगत

Indication of Nagpur-Singapore direct flight service; Indicative letter from Minister of Aviation | नागपूर- सिंगापूर थेट विमान सेवेचे संकेत; विमान वाहतूक मंत्र्यांचं सूचक पत्र

नागपूर- सिंगापूर थेट विमान सेवेचे संकेत; विमान वाहतूक मंत्र्यांचं सूचक पत्र

नागपूर: येत्या काळात नागपूर ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून विनंती केली होती. या पत्राला सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून विदर्भाच्या विकासाची व्यवहार्य मागणी लक्षात घेता भारतीय विमान कंपन्यांना नागपूर ते सिंगापूर थेट उड्डाणे सुरू करण्यासाठी अवगत केल्याचे, गडकरींना कळवले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विदर्भाच्या आर्थिक विकासाला, विशेषत: आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात चालना देण्यासाठी नागपूर ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्या चमूने ज्योतिरादित्य सिंधिया यांना विदर्भातील आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी आणि थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नागपूर आणि दक्षिण पूर्व आशिया यांच्यातील कनेक्टिव्हिटी सक्षम करण्याच्या दृष्टीने नागपूर -सिंगापूर विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांना नागपूर दौऱ्यादरम्यान या संदर्भातील पत्र सादर केले होते.

गडकरींच्या या पत्राला उत्तर म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कार्यालयाकडून गडकरींच्या कार्यालयाला पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, कोणतेही विमानतळ परदेशी विमान कंपनीसाठी 'पॉइंट ऑफ कॉल' म्हणून एएसए मध्ये नियुक्त असल्यास ते भारतात 'ने -आण' तत्वावर ऑपरेट केले जाऊ शकते. सध्या, सिंगापूरच्या नियुक्त वाहकांसाठी 'पॉइंट ऑफ कॉल' म्हणून नागपूर हे स्थान उपलब्ध नाही. भारत सरकारचे सध्या भारतीय वाहकांकडून नॉन-मेट्रो पॉईंट्सवरून थेट किंवा त्यांच्या स्वतःच्या देशांतर्गत ऑपरेशन्सद्वारे अधिक आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. जरी, सिंगापूर एअरलाइन्सच्या नियुक्त वाहकांना नागपूरवरून नियोजित प्रवासी उड्डाणे चालवण्याची परवानगी नसली तरी, भारतीय विमान कंपन्या नागपूरसह कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर/वरून सिंगापूरमधील स्थानांकरिता ऑपरेशन्स सुरु करू शकतात. त्यानुसार, भारतीय विमान कंपन्यांना नागपूर ते सिंगापूर थेट उड्डाणे सुरू करण्यासाठी अवगत करून याविषयी जागरूकता आणण्यात येत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी विदर्भाची गरज लक्षात घेतल्याबद्दल मंत्र्यांचे आभार मानले असून नागपूर ते सिंगापूर कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी भारतीय विमान कंपन्यांच्या प्रमुखांकडे त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Indication of Nagpur-Singapore direct flight service; Indicative letter from Minister of Aviation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.