विदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 10:35 PM2022-07-15T22:35:33+5:302022-07-15T22:36:32+5:30

Nagpur News शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले.

Indications of shift of Vidarbha agriculture from rice to sugarcane | विदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत

विदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर भोंगळे यांना ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ प्रदान


नागपूर : शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे पत्रकार व लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांना शुक्रवारी पवार यांच्या हस्ते ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी खा. विकास महात्मे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम काळे यांनी कार्याचा आढावा सादर केला. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे मोठे योगदान : योगेश

- कृषीच्या क्षेत्रात भारत आज स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर दिसून येतो. यात देशातील सर्वसामान्य शेतकरी व वैज्ञानिकांसोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बाबासाहेबांनी जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या कामामुळेच हे शक्य होऊ शकले, असे पवार यांनी सांगितले.

नदी जोड प्रकल्पांवर काम होण्याची गरज -गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, देशात तांदूळ, गहू, मका अतिरक्त आहे. त्यामुळे त्यावर कितीही भर दिला तरी फायदा नाही. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण देशाचा नाही, तर अर्ध्या भागाचा आहे. ही समस्या नदी जोड प्रकल्पाने दूर होऊ शकते. गंगा ते कावेरी ८६ प्रकल्प आहेत. हे काम कठीण आहे; परंतु अशक्य नाही.

भाताच्या शेतीतून बाहेर पडा -सुधीर भोंगळे

आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. सुधीर भोंगळे यांनी शेतकऱ्यांना भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पीक पद्धती बदलण्याची गरज असून, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Indications of shift of Vidarbha agriculture from rice to sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.