नागपुरात पोलिसांकडून बेफिकिरी : धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 08:37 PM2020-07-13T20:37:23+5:302020-07-13T20:40:41+5:30
अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलिसांनी चांगले परिश्रम घेतले. छातीची ढाल बनवून रखरखत्या उन्हात पोलीस सर्वत्र आढळत होते. मात्र, आता पोलीसच बेफिकिरीने वागत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पोलीस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. एकमेकांना खेटून पोलीस उभे दिसतात. सक्करदरा चौक, बेझनबाग, इतवारीसह अनेक ठिकाणी हे चित्र दिसून येते. काही ठिकाणी तर पोलीस विना मास्कनेच वावरत असल्याचे दिसतात.
शहर पोलीस दलातील ७ कर्मचारी आणि त्यांचे तीन नातेवाईक असे एकूण १० जण बाधित झालेले आहेत. तर, त्यांच्या संपर्कातील २८५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीसुद्धा पोलिसांकडून ही बेफिकिरी दाखविणे सुरू आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. या संबंधाने पोलीस इस्पितळाचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व्हावे, पोलीस ठाण्यात बसताना व्यवस्थित अंतर ठेवावे, तक्रारी अथवा तपासाची कागदपत्रे हाताळताना ग्लोव्हज घालावेत, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे.
होत असलेल्या उपाययोजना
पोलिसांना व्हिटॅमिन, सी, डी आणि अन्य आवश्यक औषध दिले जात आहे. नियमित तपासणी करून सूचनांचे पालन होत आहे की नाही, त्यावर लक्ष ठेवले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी, बंदोबस्तावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक करण्यात आल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
बेफिकिरी केली जात असेल तर ते चांगले नाही. पोलिसांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात आहेत.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पोलीस आयुक्त, नागपूर