इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान हैदराबादला वळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 01:15 AM2019-02-17T01:15:21+5:302019-02-17T01:16:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.
इंडिगोचे ६ई४८२ हे विमान निर्धारित वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता मुंबईहून रवाना झाले आणि नागपुरात १० वाजता उतरणार होते. पण विमानतळावर व्हीआयपी रेलचेल असल्यामुळे विमानाने काही वेळ आकाशात घिरट्या घातल्या. अखेर हैदराबाद येथे सकाळी १०.३० वाजता उतरविण्यात आले. जवळपास दीड तास विमानतळावर थांबविण्यात आले. विमानात इंधन भरल्यानंतर विमानाने हैदराबाद येथून दुपारी १२ वाजता उड्डाण भरले आणि १२.५० वाजता नागपूर विमातळावर पोहोचले. विमान वळविल्याची बातमी विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना नव्हती, हे विशेष.
विमानतळाच्या फ्लाईट स्टेटस चार्टमध्ये इंडिगोचे ६ई४८२ हे विमान नागपुरात १०.४३ वाजता उतरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष माहितीनुसार हे विमान नागपुरातून हैदराबाद येथे वळविल्यानंतर तेथून १२.५० वाजता नागपुरात पोहोचले.
अन्य विमानांना उशीर
शनिवारी इंडिगोचे ६ई ७१३७ नागपूर-हैदराबाद विमानाचे उड्डाण सकाळी ७.३० ऐवजी ७.४६ वाजता झाले. तर जेटचे नागपूर-अलाहाबाद ९डब्ल्यू ३५५३ विमान ४५ मिनिटे विलंबासह सकाळी ८.५५ ऐवजी ९.५५ वाजता रवाना झाले.