इंडिगोच्या नागपूर-नाशिकचे आजपासून टेकऑफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:39 PM2023-03-15T12:39:26+5:302023-03-15T12:45:21+5:30
गोवा-अहमदाबादकरिता अतिरिक्त कनेक्टिव्हिटी
नागपूर :इंडिगो एअरलाइन्सची नागपूर-नाशिक ही थेट विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. फ्लाईट ६ ई ७४५८ बुधवारी सकाळी ९.१५ वाजता नागपूर-नाशिककरिता झेप घेणार आहे.
या पहिल्या विमानात ७० प्रवासी राहणार आहेत. रात्री ७.३५ वाजता ६ ई ७४५७ नाशिकहून नागपूरसाठी उड्डाण घेईल. इंडिगोच्या या दोन्ही खेपा (जाणे-येणे) आता रोज राहणार आहे.
इंडिगो या विमानवारीचे संचालन एटीआर ७८ सीटर विमानाने करणार आहे. या माध्यमातून गोवा (मोपा) आणि अहमदाबादकरितासुद्धा अतिरिक्त कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. कारण याच विमानाने मोपा-नाशिक आणि अहमदाबाद-नाशिक ही विमानसेवासुद्धा चालविली जाणार आहे.
उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या विमानसेवेमुळे नाशिकसारख्या एका वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी परंपरा जपणाऱ्या शहराचा हवाई प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, गोदावरी नदीकाठी वसलेल्या नाशिक शहरात दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. ज्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी होतात. त्याचप्रमाणे पंचवटी, सप्तश्रुंगी, त्र्यंबकेश्वर, सीता गुहा आणि पांडव लेणी ही धार्मिक तसेच पर्यटनस्थळेसुद्धा नाशिक शहराजवळ आहेत.