इंडोनेशियन समूह विकत घेणार इंडोरामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:27 AM2019-02-09T10:27:47+5:302019-02-09T10:43:54+5:30
विदर्भातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प असलेल्या बुटीबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन विकत घेणार असल्याची माहिती इंडोरामातील सूत्रांनी दिली.
सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प असलेल्या बुटीबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन विकत घेणार असल्याची माहिती इंडोरामातील सूत्रांनी दिली.
बुटीबोरीची इंडोरामा सिंथेटिक्स ही दिल्लीच्या ओमप्रकाश (ओपी) लोहिया यांची कंपनी असून ती पॉलिस्टर धागे व पॉलिमरचे उत्पादन करते. १९९३ साली इंडोरामा विदर्भात आली व कंपनीने १९९६ मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. दरम्यानच्या काळात कंपनीने प्रकल्पाचा विस्तार केला व पार्शिअली ओरिएंटेड यार्न (पीओवाय), पॉलिस्टर स्टेपल फायबर (पीएसएफ), फुल्ली ड्रॉन यार्न (एफडीवाय), ड्रॉ टेक्स्चराईज्ड यार्न (डीटीवाय) अशी कृत्रिम धाग्यांची मालिका पूर्ण केली. सध्या इंडोरामाची उत्पादन क्षमता वर्षाला ६.५० लाख टन असून गुंतवणूक ४५०० कोटीची आहे. इंडोरामामध्ये एकूण ३००० कामगार/ कर्मचारी नोकरीत आहेत.
इंडोरामाने २००३ साली आपला स्पिनींग प्रकल्प पुण्याच्या चौधरी ग्लोबल समूहाच्या स्पेन्टेक्स इंडस्ट्रीजला विकून फक्त कृत्रिम धाग्यांवर लक्ष केंद्रित केले. इंडोरामाचे कृत्रिम धागे अनेक देशात निर्यात होतात.
मात्र गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कृत्रिम धाग्यांची मागणी घटल्यामुळे इंडोरामाला आपले उत्पादन कमी करावे लागले व सध्या कंपनी आपली ३० टक्के क्षमता वापरत आहे. परिणामी कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. म्हणून लोहिया यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंडोरामा कॉर्पोरेशनचे मुख्यालय इंडोनेशियातील जकार्तामध्ये आहे. परंतु एस.पी. लोहिया व त्यांचे चिरंजीव अमित लोहिया हे लंडनमधून समूहाचा व्यवसाय नियंत्रित करतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या बुटबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स प्रकल्पाची मूल्यांकन प्रक्रिया (ड्यू डिलीजन्स) सुरू असून त्यासाठी इंडोनेशियावरून १० ते १२ अंकेक्षकांचे पथक बुटीबोरीत दाखल झाले आहे. संपूर्ण विक्री व्यवहार जून-जुलैपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान याबाबतीत इंडोरामा सिंथेटिक्सचे अध्यक्ष व प्रबंध संचालक ओ.पी. लोहिया व कार्यकारी संचालक विशाल लोहिया यांचेशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
जगातील सर्वात मोठा कृत्रिम धागे बनवणारा समूह
ही कंपनी विकत घेणारी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन ही कंपनी ओपी लोहिया यांचे लहान बंधू श्री प्रकाश (एस पी) लोहिया यांची आहे. इंडोरामा कॉर्पोरेशन ही जगातील सर्वात मोठा कृत्रिम धागे बनवणारा समूह असून ३० देशात मिळून ७० कारखाने हा समूह चालवतो. इंडोरामा कॉर्पोरेशनची वार्षिक उलाढाल ८.४० अब्ज डॉलर्स (५९,००० कोटी रुपये) आहे व समूहात ३०,००० कर्मचारी आहेत.