इंद्रदेव लालची व बदमाश होते : नाना पटोलेंनी उधळली मुक्ताफळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:35 AM2019-04-05T01:35:34+5:302019-04-05T01:36:33+5:30
महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार पुत्राची पाठ थोपटणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचीदेखील जीभ घसरली आहे. इंद्रदेव हे लालची व बदमाश देव होते, अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, देवदेवतांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार पुत्राची पाठ थोपटणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचीदेखील जीभ घसरली आहे. इंद्रदेव हे लालची व बदमाश देव होते, अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, देवदेवतांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
नागपुरात दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पटोले यांनी बोलताना वरील वादग्रस्त वक्तव्य केले. इंद्रदेवाचा करिश्मा तुम्हाला माहीत आहे. इंद्रदेव फार लालची होते व फार बदमाशदेखील होते. जेव्हा जेव्हा वार पडायचा तेव्हा ते वर जायचे. आपल्या इथे वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र आहे. दोघांच्याही नावात इंद्र आहे. आता जनता मोठी देव आहे. त्यामुळे या इंद्राला वाचवायचे की मारायचे हे ठरवायचे काम तुमचे आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. मेट्रो, मिहानवरुन नागपुरचा प्रचार सुरू झाला होता. गडकरी यांनी विकासकामांच्या आधारावरच प्रचार सुरू केला आहे तर दुसरीकडे विरोधकांच्या वक्तव्यातून वाद निर्माण होत आहेत. काही दिवसाअगोदर पीरिपाचे नेते व आमदार पुत्र जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर प्रचारातील चर्चा ‘मेट्रो’, मिहानवरुन थेट महिलांच्या कपाळावरील कुंकवावर गेली होती. आता पटोले यांच्या या वक्तव्यामुळे प्रचारात इंद्राचा नवा मुद्दा समोर आला असून यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.