समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा औद्योगिक विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 08:49 PM2018-09-15T20:49:08+5:302018-09-15T20:52:03+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला होणार आहे. या महामार्र्गामुळे बिझनेस आणि इंडस्ट्री कॉरिडोर तयार होऊन या भागात उद्योगाच्या अपार संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला होणार आहे. या महामार्र्गामुळे बिझनेस आणि इंडस्ट्री कॉरिडोर तयार होऊन या भागात उद्योगाच्या अपार संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) ५५ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आयोजित व्हीआयए-सोलर विदर्भ गौरव पुरस्कार-२०१८ समारंभात मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आठ वर्गवारीत विदर्भातील उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सोलर समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सत्यनारायण नुवाल, न्यायमूर्ती (निवृत्त) पी.सी. शिरपूरकर, कॉन्फेडेरेन्स समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा उपस्थित होते.
राज्यात ४८ टक्के विदेशी गुुंतवणूक
मुख्यमंत्री म्हणाले, पुरस्कार वितरण समारंभ प्रशंसनीय असून त्यामुळे अन्य उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. समृद्धी महामार्गासाठी ७०० कि़मी. जमिनीचे अधिग्रहण नऊ महिन्यात केले आहे. काम सुरू होणार आहे. लॉजिस्टिकमध्ये लोकांची रुची दिसून येत आहे. हा मार्ग थेट पोर्टशी जुळणार आहे. त्यामुळे विदर्भात गुंतवणुकीसाठी उद्योजकांचा कल वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा तयार करीत आहे. एका सर्वेनुसार ५१ टक्के पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. याच शृंखलेत मागास भागाचाही विकास सुरू आहे.
महाराष्ट्रात ४८ टक्के विदेशी गुंतवणूक झाली आहे. अन्य राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना विजेच्या टेरिफमधील इन्सेन्टिव्हची मुदत मार्च-२०१९नंतरही पाच वर्षे सुरू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दुबईतील डीपी वर्ल्ड रिएलिटिज हा समूह नागपुरात लॉजिस्टिक सुरू करण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास
अमरावती येथील औद्योगिक भागात टेक्सटाईल पार्कमध्ये ३० मोठे उद्योग सुरू झाले आहे. आता तिथे प्लॉट नाही. नवीन जागेचे संपादन करण्यात येत आहे. हा विकास तीन वर्षांत झाला आहे. टेक्सटाईल पॉलिसीमध्ये विदर्भ आणि कापूस उत्पादन भागाला प्रोत्साहन दिले आहे. आठवड्यात फाईल प्रिंट देणार आहे. गडचिरोली येथेही लॉईड समूह स्टील प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासोबत मोठे उद्योग या भागात येतील. इंडस्ट्री पॉलिसीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना निश्चित बुस्ट मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
प्रारंभी अतुल पांडे यांनी विदर्भातील औद्योगिक क्षेत्राची माहिती दिली. अन्य राज्याच्या तुलनेत विजेचे दर कमी करावेत. राज्याने पाच जिल्ह्यांना नो इंडस्ट्री जिल्हे म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे वाशीम व गडचिरोली जिल्ह्यात उद्योग यावेत. व्हीआयएच्या पुरस्कारामुळे नवीन उद्योजकांना बळ मिळेल. नुवाल म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना प्रोत्साहन देणारे निर्णय राज्याच्या इंडस्ट्री पॉलिसीमध्ये असावेत. त्यामुळे विदर्भाचा विकास होणार आहे.
संचालन श्वेता शेलगांवकर यांनी तर व्हीआयएचे सचिव डॉ. सुहास बुद्धे यांनी आभार मानले.
यावेळी खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. आशिष देशमुख, आ. गिरीश व्यास, माजी खा. अजय संचेती, माजी आ. रमेश बंग, राज्य लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, व्हीआयएचे माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, प्रफुल्ल दोशी, उपाध्यक्ष सुरेश राठी, प्रशांत मोहता, आर.बी. गोयनका, पंकज बक्षी, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्ष रिता लांजेवार, माजी अध्यक्ष सची मलिक, चित्रा पराते, नीलम बोवाडे, योगिता देशमुख, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव सीए मिलिंद कानडे, एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी, डिक्कीचे अध्यक्ष निश्चय शेळके, अतुल कोटेचा, सीए अनिल पारख, दीपक अग्रवाल, सचिन पुनियानी आणि विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध वर्गवारीत विदर्भातील पुरस्कारप्राप्त उद्योग
१) मोठे उद्योग : रेमंड यूको डेनियम प्रा.लि., यवतमाळ.
२) मध्यम उद्योग : स्पेसवूड फर्निचर प्रा.लि., नागपूर.
३) लघु उद्योग : मॅकनल न्यूमॅटिकल्स प्रा.लि.
४) महिला उद्योजिका पुरस्कार : ग्लोबल सायन्टिफिक इंक., नागपूर.
५) बेस्ट स्टॉर्टअप आॅफ द रिजन : फेनडेल टेक्नॉलॉजी प्रा.लि., नागपूर.
६) मोस्ट प्रॉमिसिंग युनिट इन डेव्हलमेंट डिस्ट्रिक्स : शुभलक्ष्मी फूड प्रॉडक्ट, गोंदिया.
७) बेस्ट एक्स्पोर्टर आॅफ द रिजन : झीम लेबॉरेटरीज, कळमेश्वर.
८) जीवन गौरव पुरस्कार : दिनशॉ समूह, नागपूर.