आदिवासी क्षेत्रात कृषी मालावर आधारित उद्योग हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:43+5:302021-06-29T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कृषी मालावर आधारित उद्योग ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात सुरू झाले तर अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो व शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. जागतिक एमएसएमई दिनानिमित्त इंडियन बँकेच्या एमएसएमई प्रेरणा या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते.
देशासमोर आज गरिबी, उपासमार आणि बेरोजगारीचे मोठे आव्हान उभे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी रोजगार निर्मितीशिवाय पर्याय नाही. रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता, नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व कौशल्य आणि जिद्द असलेल्या उद्योजक तरुणांच्या मागे मदतीसाठी बँकांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी करताना गती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रणाली, कमी वेळात निर्णय पद्धती अवलंबिणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. एमएसएमई हा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील आर्थिक, सामाजिक परिवर्तनामध्ये एमएसएमईचा मोठा सहभाग आहे. एमएसएमईचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३० टक्के आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.