उद्योगांनी रिक्त सिलिंडर पुरवठादारांना परत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:13+5:302021-04-29T04:06:13+5:30

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा जिल्हा, राज्य आणि अन्य राज्यातून होत ...

Industries should return empty cylinders to suppliers | उद्योगांनी रिक्त सिलिंडर पुरवठादारांना परत करावे

उद्योगांनी रिक्त सिलिंडर पुरवठादारांना परत करावे

Next

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा जिल्हा, राज्य आणि अन्य राज्यातून होत आहे, पण रिक्त सिलिंडरअभावी रुग्णालयाला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य नाही. अशा स्थितीत ज्या कंपन्यांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा वापर होतो आणि त्यांच्याकडे रिक्त सिलिंडर असेल, तर त्यांनी ते पुरवठादारांना परत करावेत. त्यामुळे त्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा रुग्णालयाला करणे शक्य होणार आहे.

विदर्भातील विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कंपन्यांना रिक्त वा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार आणि प्रशासनाला परत करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, सीआयआयचे चेअरमन रणजीत सिंग, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते, डिक्की विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष निश्चय शेळके आणि सर्व समन्वयक समितीचे सदस्य उपस्थित होते.

सुरेश राठी म्हणाले, ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा जीव जात आहे. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे. नागपूर जिल्ह्यात २३०० पेक्षा जास्त उद्योग आहेत. त्यापैकी अनेक उद्योगांमध्ये आॅक्सिजन सिलिंडरचा उपयोग करण्यात येतो. अशा कठीणसमयी उद्योगांनी त्यांच्याकडील भरलेले वा रिक्त सिलिंडर पुरवठादारांना परत करावेत. ते सिलिंडर भरून वैद्यकीय कामात येतील, त्यामुळे रुग्णांचा जीव वाचले. याशिवाय ज्या उद्योगात आॅक्सिजन स्टोरेज टँक असेल त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच जवळच्या आॅक्सिजन प्रकल्पातून आॅक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी मदत करावी. कठीणसमयी उद्योजकांनाही रुग्ण आणि प्रशासनाला मदत करण्याची गरज आहे आणि ते काम उद्योजक सामाजिक कार्यांतर्गत पार पाडतील, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Web Title: Industries should return empty cylinders to suppliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.