राज्यातील उद्योगांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:45 AM2020-07-18T11:45:19+5:302020-07-18T11:48:22+5:30
मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉकमध्ये उद्योजकांनी उत्साहाने उद्योग सुरू केले होते; पण ऑर्डर नसल्याने अनेक औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी उत्पादन कमी केले तर काहींनी उद्योग बंद केले आहेत. संपूर्ण देशात उद्योगांची स्थिती सुरळीत नसल्याने मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनपूर्वी नागपूर जिल्ह्यात जवळपास २९०० उद्योग सुरू होते. त्यानंतर सर्वच उद्योगांनी नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेतली. त्यातील जवळपास २५५० उद्योग सुरू झाले. सध्या ४५ ते ५० टक्के उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून औद्योगिक क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली. ही मागणी जुलैमध्ये फार कमी झाली आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सामाजिक चक्रानंतर आर्थिक चक्र चालते. पण सध्या उद्योगांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लघुउद्योगांचे सर्वात जास्त हाल होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
कामगारांना पगार देणे कठीण
उद्योगांना ऑर्डर मिळाल्यास कंत्राटी पद्धतीने आठवड्यासाठी कामगार कामावर ठेवावे लागतात. ऑर्डर तीन दिवसात पूर्ण झाली तर कामगारांना आठवड्याचा पगार द्यावा लागतो. सध्या मालाला उठाव नसल्याने कुणीही उद्योजक ऑर्डरविना उत्पादनाचा अतिरिक्त साठा करण्यास तयार नाही. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग मालाचे जास्त उत्पादन होते. पण सध्या इंजिनिअरिंग उत्पादनांना फारच कमी मागणी आहे. उत्पादनांना मागणी येण्यास आणखी काही महिने लागणार आहे. त्यानंतरच स्थिती सुरळीत होईल, असे उद्योजकांनी स्पष्ट केले.
आर्थिक घडी सुरळीत होण्याची अपेक्षा
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाचे नियम सारखे नाहीत. राज्य शासनाचे प्रशासनावर नियंत्रण नाही. स्थानिक प्रशासन उद्योगधंदे बंद करण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे महसूल संकलनावर परिणाम झाला आहे. विजेची मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कारखाना सुरू ठेवायचा की नाही, असे प्रश्न उद्योजकांसमोर उभे राहिले आहेत.
कोडे सुटताना दिसत नाही. जास्त उत्पादनाचा साठा करून काय करणार, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा काही दिवस बंद करण्यावर उद्योजकांचा भर दिसून येत आहे. घडी सुरळीत झाल्यानंतर आणि मागणी वाढल्यानंतरच उद्योगांना सुगीचे दिवस येतील, असे मत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे यांनी व्यक्त केले.