उद्योगांना निर्यातीसाठी होणार सिंदी ड्रायपोर्टचा फायदा - नितीन गडकरी
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 2, 2024 07:26 PM2024-03-02T19:26:38+5:302024-03-02T19:26:56+5:30
एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात मुख्य अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते.
नागपूर : सिंदी ड्रायपोर्ट सुरू झाल्यावर विदर्भातील उद्योगांना निर्यातीसाठी एक सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीमधील उद्योगांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात मुख्य अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते. मंचावर एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार, असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, सचिव पी. मोहन, उपाध्यक्ष गणेश जयस्वाल, कोषाध्यक्ष अरूण लांजेवार आणि योगेश कटारिया उपस्थित होते. यावेळी गडकरी यांच्या हस्ते उद्योजकांना सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विकासाबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे
एमआयडीसीचे अधिकारी विकासाची कोणतीही कामे करीत नाहीत. या क्षेत्रातील जागेच्या किमती वाढल्या आहेत. विस्ताराला वाव नाही. अनेक कारखाने बंद आहेत. कारखाने सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांकरिता जागा नाही. अनेक उत्पादन प्रकल्पाचे व्यासायिकीकरण झाले आहे. नवीन उत्पादन प्रकल्पांना जागा मिळत नाही. अधिकारी या क्षेत्राचा विकास करीत नाही.
गडकरी यांनी एमआयडीसी परिसरातील पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासंदर्भात तसेच येथील उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याची सूचना केली. येथील समस्या सोडविण्यावर भर राहील. बुटीबोरीतील औद्योगिक वसाहत खूप मोठी आहे. याठिकाणी बराच विकास झाला आणि आणखी बरीच कामे भविष्यात होणार आहेत.
सी.एम. रणधीर म्हणाले, हिंगणा एमआयडीसी स्थापनेला ५३ वर्ष झाली असून पायाभूत सुविधांचा अजूनही विकास करण्यात आलेला नाही. एमआयडीसीची विकासाची गती संथ आहे. पिण्याचे पाणी, सिव्हरेज, अंबाझरी तलावातून होणारा दुषित पाण्याचा पुरवठा यासह अनेक समस्या आहेत. या क्षेत्रात कामगारांसाठी रुग्णालय असावे. रणधीर यांनी विविध समस्यांचे निवेदन गडकरी यांना दिले.
चार जणांना मिळाला सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार
- वैभव प्लास्टो प्रिंटिंग अॅण्ड पॅकेजिंग प्रा.लि. - वैभव अग्रवाल.
- चामुंडी एक्स्लोसिव्ह प्रा.लि. - जय खेमका.
- जेडीएस ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीज प्रा.लि. - दक्षा पटेल.
- व्ही.एस. ऑटोटेक प्रा.लि. - नागराज रेड्डी.