उद्योग सुरू, पण गती मिळेना; कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:51 AM2020-05-21T09:51:49+5:302020-05-21T09:52:24+5:30

कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून उद्योग सुरू करण्याची परवानगी उद्योजकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील काही उद्योग सुरू झाले, पण कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत.

The industry continued, but did not gain momentum; Shortage of workers and challenges facing entrepreneurs due to lack of raw materials | उद्योग सुरू, पण गती मिळेना; कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने

उद्योग सुरू, पण गती मिळेना; कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून उद्योग सुरू करण्याची परवानगी उद्योजकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील काही उद्योग सुरू झाले, पण कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. शिवाय मालाला मागणी नसल्याने उद्योगांना अजूनही गती मिळाली नाही.

नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि अन्य तालुकास्तरावर औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये सर्वच उद्योगांनी परवानगी घेतली असून राज्य शासनाकडे त्याची नोंद झालेली आहे. पण त्यापैकी ५० टक्के लघु आणि मध्यम उद्योग सुरू झाले असून ३० ते ४० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू आहे. या वसाहतींमध्ये मोठे उद्योग सुरू झालेले नाहीत. इंजिनिअरिंग उत्पादनांचे काहीच युनिट सुरू आहेत. याशिवाय जीवनावश्यक वस्तू, कृषी प्रक्रिया आणि औषधांचे युनिट निरंतर सुरू आहेत. एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काम करणारे ५० टक्के अकुशल कामगार आणि तांत्रिक काम करणारे परप्रांतीय आहेत. त्यातील ८० टक्के स्वगृही परतले आहेत. शिवाय काही कुशल कामगार हे नागपूरचे आहेत, पण त्यांना सर्व अडथळ्यांवर मात करीत एमआयडीसीत पोहोचावे लागत आहे. काही परप्रांतीय कारखान्यांमध्ये राहत आहेत. त्यांची सर्व व्यवस्था उद्योजकांना करावी लागत आहे. अनेक उद्योजकांकडे कंत्राटदारांची माणसे काम करतात. लॉकडाऊनच्या काळात कंत्राटदाराने कामगारांना पैसे न दिल्याने नाराज होऊन सर्वच आपापल्या गावात परतले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्र अडचणीत असले तरी लॉकडाऊननंतर कामगार आणि उद्योजक या दोघांसाठी अनेक संधी निर्माण होणार असल्याचे मत काही उद्योजकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. परराज्यातील मजूर व कामगार परत आल्यानंतर स्थानिक कामगारांना उत्तम संधी निर्माण होतील, असे काही उद्योजक म्हणाले.

कंत्राटी कामगारांची आवश्यकता
उद्योग क्षेत्रात अधिकाऱ्यांसोबत कुशल आणि अकुशल हे दोन्ही कामगार लागतात. सातवी पास तरुणालाही नोकरी मिळू शकते. त्यांना ७ हजारांपासून १५ हजारांपर्यंत पगार मिळू शकतो. परप्रांतीय कामगार अत्यंत परिश्रमाने काम करतात, त्याप्रमाणेच स्थानिक कामगारांनीही काम करायला हवे. मेहनत, काम करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गोष्टी उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. सध्या स्थानिक कामगारांची भरती सुरू आहे. आयटीआयच्या वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन ट्रेड शिकलेल्या तरुणांना एमआयडीसीमध्ये मागणी असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

मोठे उद्योग बंद, लघु व मध्यम सुरू
उद्योग सुरू करण्याची परवानगी सर्वच उद्योजकांनी घेतली, पण त्यातील ५० टक्केच उद्योग सुरू झाले आहेत. यात रोलिंग मिल, इंजिनिअरिंग आणि प्लॅस्टिक उद्योग आहेत. त्यांची उत्पादन क्षमता ३० ते ४० टक्के आहे. कामगार, कच्चा माल आणि मालाची वाहतूक यांची समस्या अजूनही कायम आहे. अन्य बाजारपेठा खुल्या न झाल्याने मोठे उद्योग सुरू झाले नाहीत.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन.

५० टक्के उद्योग सुरू
हिंगणा एमआयडीत सर्वच उद्योगांनी प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. पण त्यातील ५० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. त्यात लघु व मध्यम उद्योगांचा समावेश आहे. कामगार आणि कच्च्या मालाची समस्या कायम आहे. परप्रांतीय मजूर परत गेल्याने ही समस्या पुढेही कायम राहणार आहे. हिंगणा परिसर आणि स्थानिक व काही परप्रांतीयांच्या भरोशावर काम सुरू आहे.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए असोसिएशन.

 

Web Title: The industry continued, but did not gain momentum; Shortage of workers and challenges facing entrepreneurs due to lack of raw materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.