आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:29 AM2024-07-08T08:29:09+5:302024-07-08T08:29:18+5:30
रिझर्व्ह बँकेनुसार २ वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र ‘नंबर वन’वर आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
नागपूर : महायुती सरकारवर सातत्याने आक्रमण होत आहेत; पण दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातीलपरकीय गुंतवणूक देशात तिसऱ्या क्रमांकावर होती. रिझर्व्ह बँकेनुसार २ वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र ‘नंबर वन’वर आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
‘लोकमत’चे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां. वा. गाडगीळ आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ रविवारी नागपुरातील वसंतराव नाईक मेमोरियल हॉल (वनामती) येथे उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत होते. प्रमुख वक्ते म्हणून ‘इंडिया टुडे’चे माजी संपादक तथा न्यू इंडियन एक्स्प्रेसचे संपादकीय संचालक पद्मभूषण प्रभू चावला उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या रूपात सर्वसामान्य रिक्षाचालक मुख्यमंत्री होत होता व त्यात माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी त्यांच्यासोबत आलो, असेही यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेचे परीक्षण करणारे ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप व माजी संपादक दिलीप तिखिले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यांचा झाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
पां. वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा-
वर्ष २०२१
प्रथम - वंदना धर्माधिकारी, पुणे. (आत्मनिर्भर, साप्ताहिक अर्थशक्ती)
द्वितीय - विनोद धनाजी शेंडे, पुणे. (भूक निर्देशांक : घसरणीचा विकास, लोकसत्ता)
तृतीय - प्रवीण घोडेस्वार, नाशिक (महिला स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था, मिळून साऱ्याजणी)
वर्ष २०२२
प्रथम - सूर्यकांत पाठक, पुणे. (ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी, ग्राहकहित).
द्वितीय - डॉ. प्रतिमा इंगोले, अमरावती. (शेतीचा शोध घेऊनही स्त्रीची आर्थिक कोंडी, पुण्यनगरी).
तृतीय - समीर मराठे, नाशिक. (ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावरील लेख, ‘उस्ताद’, लोकमत).
म. य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा
वर्ष २०२१
प्रथम - डॉ. योगेश पांडे, नागपूर (नागपुरात ‘नीट’चा घोटाळा, लोकमत)
द्वितीय - विश्वास पाटील, कोल्हापूर. (दामदुप्पट परताव्याचा भूलभुलय्या, लोकमत).
तृतीय - विवेक भुसे, पुणे. (राज्यभर गाजलेल्या स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार, लोकमत).
वर्ष २०२२
प्रथम - बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर. (शेकडो कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्याचा भंडाफोड, लोकमत).
द्वितीय - इंदुमती सूर्यवंशी, कोल्हापूर. (जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री, लोकमत).
तृतीय - सुमेध वाघमारे, नागपूर. (शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव, लोकमत).
‘फेवर’ करायचे नाही, हीच खरी पत्रकारिता
प्रादेशिक पत्रकार प्रामाणिक आहेत. त्यांच्यामुळेच देशात पत्रकारिता जिवंत आहे, असे सांगत घाबरायचे नाही, ‘फेवर’ करायचे नाही, ही खरी पत्रकारिता आहे, असे इंडिया टुडेचे माजी संपादक तथा न्यू इंडियन एक्स्प्रेसचे संपादकीय संचालक पद्मभूषण प्रभू चावला म्हणाले.
‘२०२४ चा जनादेश आणि मीडियाची भूमिका’ या विषयावर चावला यांनी मत मांडले. ते म्हणाले, मार्चमध्ये एक संपादकीय लिहिले व त्यात भाजपच्या ४०० पार वर प्रश्न उपस्थित केले होते. ४०० जागा आल्या नाहीत. कारण लाट सरकारविरोधात होती. ती सरकारच्या लक्षात आली नाही. सर्वांना सोबत घेऊन चला, हाच या जनादेशाचा अर्थ आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकांशी नाळ तुटल्यानेच एक्झिट पोल फसले : डॉ. विजय दर्डा
लोकसभेवेळी एक्झिट पोल व सर्व्हे चुकीचे ठरले. मीडियाची लोकांशी नाळ तुटल्यानेच त्यांचे अंदाज फसले. लोकमतचा महाराष्ट्राचा सर्व्हे बरोबर आला. लोकमत जनतेशी जुळला असल्याने हे शक्य झाले, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खा. डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
डॉ. दर्डा म्हणाले, आपल्या पहिल्या व दुसऱ्या संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे लोकमत हे देशातील एकमेव वृत्तपत्र आहे. त्याचे हे ३६ वे वर्ष आहे. स्व. जवाहरलालजी दर्डा मंत्री होते. राजेंद्र दर्डा मंत्री होते. मीही खासदार होतो. मात्र लोकमतने आमचे जेथे चुकले तेथे लिहिण्याचे काम केले. जवाहरलालजी दर्डा मंत्री असताना इंदिरा गांधी यांच्याविरोधात संपादकीय प्रकाशित झाले. त्याच दिवशी इंदिराजी आमच्या घरी नाश्त्याला आल्या होत्या. त्यांनी बाबूजींना लोकमत दाखविला व तुम्ही हे वाचले का, असे विचारले. त्यावर बाबूजींनी माझा वृत्तपत्राच्या कामात हस्तक्षेप नाही, मी मंत्री असलो तरी माझ्या विरोधातही बातम्या प्रकाशित होतात, असे इंदिराजींना सांगितले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.