दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपात असमानता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:48+5:302021-04-08T04:08:48+5:30
नागपूर : दलित वस्ती सुधार योजना व दलितेतर विकास निधी या दोन्ही योजनांच्या निधी वाटपात पालकमंत्री नितीन राऊत यांनी ...
नागपूर : दलित वस्ती सुधार योजना व दलितेतर विकास निधी या दोन्ही योजनांच्या निधी वाटपात पालकमंत्री नितीन राऊत यांनी भेदभाव केला आहे. स्वत:च्या मतदारसंघाला झुकते माप देऊन इतर पाच विधानसभा मतदारसंघांना तुटपुंजी रक्कम दिल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.
या दोन्ही योजनांच्या २०२०-२१ च्या निधी वाटपात पालकमंत्र्यांनी असमानता दाखविली आहे. योजनांच्या ८० कोटींच्या निधीपैकी सुमारे ५० कोटींचा निधी उत्तर नागपूरला दिला आहे. उर्वरित ३० कोटींच्या निधीचे पाच मतदारसंघांमध्ये वाटप करण्यात आले आहे. ही बाब न्यायसंगत नसून इतर मतदारसंघांवर अन्याय आहे. या निधीचे समान वाटप करण्यात यावे, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले आहे.