कुख्यात अब्दुल लागला नागपूर पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:15 AM2020-09-17T01:15:50+5:302020-09-17T01:17:09+5:30
हवालाची रक्कम लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून त्याने ३० लाखांची रक्कम लुटली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवालाची रक्कम लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून त्याने ३० लाखांची रक्कम लुटली होती. अब्दुल लतीफ अब्दुल रज्जाक (४४) रा. बांगडे प्लॉट, शांतीनगर असे आरोपीचे नाव आहे. लातूर पोलीस मागील तीन वर्षांपासून त्याच्या शोधात होते. अब्दुल विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने २०१७ मध्ये आपल्या साथीदारांसह लातूरमधील एका व्यावसायिकाच्या गोडाऊनवर धाड टाकून पोलीस असल्याचे सांगितले. गोदामातील ३० लाखाची रक्कम त्याने लुटली. लातून पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली. त्यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. परंतु तेंव्हापासून अब्दुल फरार होता. तो शांतीनगर भागात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक अशोक मेश्राम यांनी याची सूचना पोलीस उपायुक्त गजानन राजमाने सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांना दिली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण चौगले, शिपाई आशिष क्षीरसागर आदींनी अब्दुलला अटक केली. त्याच्याकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. लातूर पोलीस लवकरच नागपुरात येऊन अब्दुलला ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.