कुख्यात बुकी पंकज कढीचे दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:33+5:302021-03-19T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात बुकी पंकज कढी ऊर्फ पंकज वासवानी याच्या ‘पंकज समोसा’ नामक दुकानावर परिमंडळ पाचचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात बुकी पंकज कढी ऊर्फ पंकज वासवानी याच्या ‘पंकज समोसा’ नामक दुकानावर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी बुधवारी रात्री छापा घातला. मनाई असताना मोठ्या प्रमाणात ग्राहक जमवून दुकानातून समोसा विकला जात असल्याचे दिसून येताच पोलिसांनी दुकानाला सील लावले.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात पंकज वासवानीचे समोस्याचे दुकान असून, या दुकानाच्या आडून पंकज क्रिकेट सट्टाची बॅटिंग करीत होता. (त्यामुळे त्याला पंकज कढी नाव पडले.) गेल्या आयपीएल दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर नजर रोखल्यामुळे तो येथून पळून गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या तो गोव्यातून क्रिकेट सट्टाचे दुकान चालवतो. येथे समोसा, मिरची भज्याची दुकान त्याचा भाऊ पवन वासवानी नोकरांच्या साहाय्याने चालवतो. या दुकानात मोठी गर्दी असते. नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे प्रशासनाने दुपारी १ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे; मात्र रात्रीचे ७.३० वाजूनही पंकजच्या दुकानातून ग्राहकांना समोसे, मिरची भजे विकले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे परिमंडळ ५ चे उपायुक्त नीलोत्पल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुकानावर छापा घातला. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून ग्राहक पळून गेले; मात्र दुकानात पवन वासवानी आणि त्याचे ९ नोकर आढळले. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्याची परवानगी नाही. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये, अशा खास सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; मात्र या दुकानात पवन आणि त्याचे ९ नोकर दाटीवाटीने उभे असल्याचे पोलिसांना दिसले. यासंदर्भात उपायुक्त नीलोत्पल यांनी वासवानीला विचारणा केली असता, त्याने दुकान कधीचेच बंद केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्री ७.३० वाजेपर्यंत तेथून ग्राहकांना समोसा, भजे, कढी विकली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून या दुकानाला सील लावले.
----
साथरोग नियंत्रण प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल
याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी वासवानी तसेच त्याच्या ९ नोकरांविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.