कुख्यात कोतुलवार बंधू गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:13 AM2021-02-17T04:13:20+5:302021-02-17T04:13:20+5:30
पिस्तुल, ३ जिवंत काडतूस जप्त - ६० ग्राम एमडी पावडरही जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कुख्यात गुंड दिवाकर ...
पिस्तुल, ३ जिवंत काडतूस जप्त - ६० ग्राम एमडी पावडरही जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कुख्यात गुंड दिवाकर तसेच त्याचा भाऊ आशू ऊर्फ आशिष बबनराव कोतुलवार या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस तसेच ६० ग्रामएमडी पावडरही जप्त करण्यात आली.
दिवाकर आणि आशू हे दोघेही हार्डकोअर क्रिमिनल्स असून त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोघे नरेंद्रनगरातील तिरूपती एन्क्लेव्ह नामक ईमारतीत राहत असल्याची आणि त्यांच्याकडे पिस्तूल असून ते कुणाचा तरी गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास या इमारतीत छापा घातला. यावेळी पोलिसांना आशू कोतुलवार हाती लागला. त्यांच्या सदनिकेतून एक पिस्तुल आणि ३ जिवंत काडतूस तसेच ६० ग्राम एमडी पावडर पोलिसांनी जप्त केले. आशू ज्या सदनिकेत राहत होता. ती मुंबईतील एका महिलेच्या मालकीची असल्याचे समजते. आशूने ब्रोकरमार्फत ही सदनिका ६ महिन्यांपूर्वी १६ हजार रुपये महिना भाड्याने घेतली होती. दरम्यान, आशूविरुद्ध बेलतरोडी ठाण्यात एनडीपीएस तसेच आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करून त्याचा ५ दिवसांचा पीसीआर मिळविण्यात आला.
दिवाकरही जेरबंद
या कारवाईनंतर पोलिसांनी दिवाकरलाही ताब्यात घेतले. दिवाकरविरुद्ध बलात्कार आणि खंडणी वसुलीची तक्रार बजाजनगर ठाण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला बाहेरगावची रहिवासी असून ती आधी एका गुन्हेगाराची प्रेयसी होती. नंतर ती दिवाकरच्या संपर्कात आली. तिचे लैंगिक शोषण करून तिच्याकडून रक्कम मिळावी म्हणून त्याने तिला वेठीस धरले होते, अशी पोलिसांकडे तक्रार असल्याची माहिती आहे. पीडित महिला दहशतीत असल्यामुळे ती तक्रार करण्यास कचरत होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांनी गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोर धोरण अवलंबले आहे. त्यामुळे अनेक अन्यायग्रस्त आश्वस्त झाले आहेत.
कायद्याचा चाबूक ओढण्याची तयारी
उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, अनेक गुन्हेगारांच्या फाईल्स बाहेर काढण्यात आल्या असून, त्यांच्यावर कायद्याचा चाबूक ओढण्याची तयारी चालविली आहे. कुख्यात कोतुलवार बंधूवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकरणात झालेली कारवाई ही त्याचाच एक भाग आहे. दिवाकरला उद्या न्यायालयात हजर करून त्याचा पीसीआर मिळवण्यात येणार आहे.