कुख्यात चोरटा नानू जेरबंद

By admin | Published: February 6, 2016 03:16 AM2016-02-06T03:16:53+5:302016-02-06T03:16:53+5:30

विदर्भ, बालाघाटमध्ये घरफोड्या करून पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा कुख्यात चोरटा नानू ऊर्फ सतीश धनराज पंचेश्वर (वय २७) याला जेरबंद करण्यात प्रतापनगर पोलिसांनी अखेर यश मिळवले आहे.

The infamous thief Nanu Jerband | कुख्यात चोरटा नानू जेरबंद

कुख्यात चोरटा नानू जेरबंद

Next


नागपूर : विदर्भ, बालाघाटमध्ये घरफोड्या करून पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा कुख्यात चोरटा नानू ऊर्फ सतीश धनराज पंचेश्वर (वय २७) याला जेरबंद करण्यात प्रतापनगर पोलिसांनी अखेर यश मिळवले आहे. नानूकडून पोलिसांनी ९२ ग्रॅम सोने, एलसीडी अन् कॅमेरासह चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
बालाघाटजवळच्या तिरोडी येथील रहिवासी असलेला नानू आठ-दहा वर्षांपासून घरफोड्यात सक्रिय आहे. प्रतापनगरातही त्याने एका ठिकाणी मौल्यवान चीजवस्तू आणि दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला होता. यात एका आयफोनचाही समावेश होता. प्रतापनगर पोलिसांनी या घरफोडीची नोंद केल्यानंतर आयफोन ट्रॅकिंगमध्ये टाकला. तीन आठवड्यांपूर्वी तो आयफोन रायपूरच्या व्यक्तीकडे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे ठाणेदार गायकवाड आणि सहायक निरीक्षक मारुती मुंडे यांनी मनोज जोशी, मेजर बक्षी, आशिष तितरमारे या सहकाऱ्यांसह रायपूर गाठले. ज्यांच्याकडे तो आयफोन होता, तो मोबाईल दुरुस्त करणारा होता. त्याने दिलेल्या माहितीवरून मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबिकापूरच्या व्यक्तीला गाठले. या व्यक्तीने तो फोन आपण नानूकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी नानूचा पत्ता शोधला. तिरोडी येथून नानूबाबत माहिती मिळवली. तो तुमसर येथील घरफोडीच्या गुन्ह्यात भंडारा कारागृहात बंद असल्याचे कळाल्यामुळे २२ जानेवारीला प्रतापनगर पोलिसांनी त्याचा प्रॉडक्शन वॉरंट मिळवला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याचा पीसीआर मिळवला. नानूने पीसीआर दरम्यान नागपुरात सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. या घरफोडीतील दागिने आणि मौल्यवान चीजवस्तू त्याने वाराशिवनी, बालाघाट, झाडगाव, गोंदिया येथे विकल्याचे आणि गहाण ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यातील ९२ ग्रॅम सोने जप्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: The infamous thief Nanu Jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.