संक्रमणाचा दर २५.२५ टक्क्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:13+5:302021-05-14T04:09:13+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चाचण्याचे प्रमाण घटले आहे. अशात बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ३८०६ ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चाचण्याचे प्रमाण घटले आहे. अशात बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ३८०६ चाचण्यापैकी १०५० (२५.२५ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्येत घट झाली तरी संक्रमणाचा दर अधिक असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. १३ तालुक्यात आतापर्यंत १,३४,०८४ रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी २८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ही संख्या आता १,३४,०८४ इतकी झाली आहे.
सावनेर तालुक्यात ३८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात २०६ रुग्णांची नोंद झाली. यातील १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नरखेड तालुक्यात ६१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ५३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३७४ तर शहरात ४९३ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (६), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावात (३०), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (४) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात ६३ रुग्णांचा समावेश आहे. बेलोना, तिनखेडा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यात १४९ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ७ रुग्ण तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्राअंतर्गत ६, कोंढाळी केंद्र (१०) तर येनवा आरोग्य केंद्राअंतर्गत ५ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ३८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वानाडोंगरी येथे सर्वाधिक २१ रुग्णांची नोंद झाली. कुही तालुक्यात विविध केंद्रावर ९२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत वेलतुर, साळवा व तितूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रामटेक तालुक्यात ८ रुग्णांची नोंद झाली. रामटेक शहरात एकाही रुग्णांची नोंद झाली नाही. तालुक्यात आतार्पंत ६३८७ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५१८२ कोरोनामुक्त झाले आहेत तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११९० इतकी झाली आहे. उमरेड तालुक्यात ३९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील २० रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात ग्राफ वाढला
कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात २०८ रुग्णांची आणखी भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ८७ तर ग्रामीण भागातील १२१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात उबाळी येथे सर्वाधिक १२ रुग्णांची नोंद झाली. घोराडची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने आहे.