संसर्गजन्य आजाराचा वॉर्ड कुलूपात
By Admin | Published: February 23, 2017 02:10 AM2017-02-23T02:10:36+5:302017-02-23T02:10:36+5:30
‘स्वाईन फ्लू’सह इतर संक्रमणाचे आजार वाढल्याने शासकीय स्तरावर उपचार मिळावे म्हणून १ कोटी ९१ लाखाच्या
मेडिकल : स्वाईन फ्लू, डेंग्यूच्या रुग्णांवर होणार होता स्वतंत्र उपचार
नागपूर : ‘स्वाईन फ्लू’सह इतर संक्रमणाचे आजार वाढल्याने शासकीय स्तरावर उपचार मिळावे म्हणून १ कोटी ९१ लाखाच्या निधीतून ‘संक्रमण आजार नियंत्रण विभाग’चे (संसर्गजन्य वॉर्ड) बांधकाम करण्यात आले. बांधकाम विभागाकडून हा वॉर्ड मेडिकलकडे हस्तांतरितही झाला. परंतु दहा महिन्याचा कालावधी होऊनही हा वॉर्ड कुलूपात आहे. विशेष म्हणजे, गेल्या उन्हाळ्यात या वॉर्डात उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीतकक्ष सुरू करण्यात येणार होते, परंतु ते सुरूच झाले नाही.
शहरात २००९ मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून आले. पुढील दोन वर्षांपर्यंत याचा प्रकोप पाहायला मिळाला. संक्रमण आजार व त्यावर नियंत्रण आणि उपचाराची जबाबदारी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु, मनपाने कधीच पुढाकारच घेतला नाही. केवळ जनजागृती करणाऱ्या एजन्सीच्या रूपाने मनपाची भूमिका राहिली. मेडिकलने या विभागासाठी प्रस्ताव तयार केला. निधीसाठी प्रस्ताव जिल्हा विकास नियोजन समितीला पाठविला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांच्या कार्यकाळात सहा कोटींचा टीबी वॉर्ड परिसरात तीन मजली विभाग तयार करण्यास मंजुरी मिळाली.
पण, वर्षभरातच जिल्हा नियोजन समितीने निधी कमी केला. सहा कोटींऐवजी एक कोटी ९१ लाख देण्यास मंजुरी दिली. परंतु, या वॉर्डाच्या प्रस्तावित जागेपासून ते जागेवरील ७६ झाडे तोडण्याच्या मंजुरीला वर्ष लागले. त्यानंतरही प्रत्यक्ष बांधकाम होण्यास बराच उशीर लागला. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे येताच त्यांनी कामाला गती दिली. १८ महिन्यांच्या मुदतीत बांधकाम पूर्ण करण्यास बांधकाम विभागाला भाग पाडले.
९०० स्क्वेअर मीटर जागेवर सध्या ही इमारत उभी आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांना सामोर ठेवून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. दहा महिन्यांपूर्वी या इमारतीचे हस्तांतरण बांधकाम विभागाने मेडिकलकडे केले. परंतु अद्यापही हा वॉर्ड कुलूपात बंद आहे. येथे सोयी नसल्याने हा वॉर्ड बंद करून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.(प्रतिनिधी)