असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तरुणांमध्ये वंध्यत्वाचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 09:00 AM2022-02-25T09:00:00+5:302022-02-25T09:00:02+5:30
Nagpur News असुरक्षित व एकापेक्षा अधिक व्यक्तींशी शारीरिक संबंध आणि गर्भपाताच्या गाेळ्या सेवन करण्याचे प्रमाणही वाढले असून, या गाेष्टी पूर्वीपेक्षा सामान्य झाल्या आहेत.
मेहा शर्मा
नागपूर : गेल्या काही वर्षांत १६ ते २५ वर्षे वयाेगटातील तरुणांमध्ये लैंगिक संबंधाबाबत निष्काळजीपणा वाढल्याचे दिसून येत आहे. असुरक्षित व एकापेक्षा अधिक व्यक्तींशी शारीरिक संबंध आणि गर्भपाताच्या गाेळ्या सेवन करण्याचे प्रमाणही वाढले असून, या गाेष्टी पूर्वीपेक्षा सामान्य झाल्या आहेत. मात्र या प्रकारामुळे त्यांच्या प्रजनन संस्थेवर गंभीर परिणाम हाेत असल्याची जाणीव त्यांना नसून, अतिपणामुळे तरुणांमध्ये भविष्यात वंध्यत्व येण्याचा धाेका वाढला आहे.
जागतिक आराेग्य संघटना(डब्ल्यूएचओ)च्या आकडेवारीनुसार, २५ ते ४९ वर्षे वयाेगटातील महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण ३.९ टक्के आहे. मात्र धक्कादायक म्हणजे १५ ते ४९ वर्षे वयाेगटातील महिलांचा अभ्यास केला असता, वंध्यत्वाचे प्रमाण १६.८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. यावरून तरुणांमध्ये वंध्यत्व वाढत असल्याचे धाेकादायक संकेत मिळत आहेत.
प्रसूती आणि स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. साैम्या साेमाणी यांच्या मते, तरुण-तरुणींमध्ये पाश्चात्य जीवनशैली स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यात लैंगिक क्रिया सामान्य बाब हाेत आहे. असे असुरक्षित संबंध, एकापेक्षा अधिक पार्टनरशी संबंधामुळे अनावश्यक गर्भधारणा, वारंवार गर्भपात, लैंगिक संक्रमित आजार व लैंगिक संबंधामुळे हाेणाऱ्या संक्रमणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. ते क्षणिक सुखासाठी त्यांच्या लैंगिक भावना व प्रजनन संस्थेशी तडजाेड करीत असून, अशामुळे येत्या काही काळात वंध्यत्वाचा स्फाेट हाेईल, अशी भीती डाॅ. साेमाणी यांनी व्यक्त केली.
केवळ अनावश्यक गर्भधारणाच नाही तर लैंगिक आजाराचा धाेका बळावला आहे. त्यामुळे तरुणांना लैंगिक गाेष्टींविषयी शिक्षित करणे व त्यांचे प्रजनन आराेग्य सांभाळणे, हे डाॅक्टर व पालकांसाठी प्राधान्याचे झाले आहे. तरुणांनीही स्वत: पुढाकार घेऊन लैंगिक आराेग्य सांभाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक व्यवहार अंगिकारणे गरजेचे आहे. तरुणांना आता थांबविणे कठीण आहे. पण त्यांच्या चांगल्यासाठी शिक्षित नक्कीच करता येईल. पालक त्यांना घराबाहेर राहण्याचे, मित्रांसाेबत वेळ घालविण्याचे स्वातंत्र्य देत आहेत. पण तरुण त्याचा गैरफायदा घेत असल्याची टीका त्यांनी केली.
गर्भपाताच्या गाेळ्यांमुळे महिलांच्या गर्भाशयावर दुष्परिणाम वाढले आहेत. या गाेळ्यांचे वारंवार सेवन केल्यास गर्भाशयाला धाेका पाेहचताे. यामुळे हाेणारे इन्फेक्शन युटेरसपुरते मर्यादित न राहता फालाेपियन ट्यूबपर्यंत पाेहचते व त्यांना ब्लाॅक करते. हेच वंध्यत्वाचे कारण ठरते. डाॅ. यामिनी काळे यांच्या मते, तरुण पिढीला विवाहापूर्वी व गर्भधारणेपूर्वी समुपदेशनाची गरज आहे. अधिक पार्टनरशी संबंध प्रस्थापित करणे अनावश्यक गर्भधारणाच नाही, तर लैंगिक आजारासाठीही कारणीभूत ठरते. याेग्य व्यवहार, याेग्य वेळी लग्न व ३० वर्षांपूर्वी मुलांचे नियाेजन आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
- डाॅ. दर्शना पवार, वंध्यत्व तज्ज्ञ
लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे व माध्यमिक शिक्षणात ते सुरू करावे. लैंगिक संबंध करणे ही त्यांची निवड आहे व आपण त्यांना राेखू शकत नाही. पण गर्भनिराेधकांबाबत माहिती देऊ शकताे. मुलींनी पाळी चुकल्यास थेट गर्भपाताच्या गाेळ्या घेण्यापेक्षा स्त्रीराेग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यांनी मासिक पाळीची सायकल जाेपासणे महत्त्वाचे आहे. वेळेवर गर्भनिराेधकांचा उपयाेग करणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत त्यांची मदत करण्यास आम्ही पुढे येऊ.
- डाॅ. स्वधा काेतपल्लीवार, तज्ज्ञ