विदर्भातील लिंबाच्या बागांवर खैऱ्या राेगाचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 03:02 PM2023-08-02T15:02:03+5:302023-08-02T15:03:15+5:30
याेग्य व्यवस्थापनासाठी काळजी घ्या : ‘पीडीकेव्ही’च्या कीटकशास्त्रज्ञांचे आवाहन
नागपूर : जिल्ह्यासह विदर्भातील लिंबाच्या बागांवर खैऱ्या राेगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या राेगामुळे बागा खराब हाेऊन फळांची प्रत खालावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या राेगाचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली असून, बागांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या राेगामुळे लिंबाच्या झाडांची पाने, फांद्या व फळांवर ठळकपणे वर आलेले तांबूस चट्टे दिसतात. पानांवरील चट्यांच्या सभोवताली पिवळसर वलय तयार होते. चट्टे जसजसे जुने होतात, तसतसे पिवळसर वलयाचे प्रमाण कमी होत जाते. चट्ट्यांचे प्रमाण पानाच्या बाहेरील भागांवर किंवा एका विशिष्ट भागात मर्यादित असतात. फळांवरील चट्टे फक्त बाहेरील सालीवर आढळतात व आतला भाग शाबूत राहतो. खैऱ्याचे चट्टे असलेल्या फळांना बाजारात अत्यंत कमी भाव मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
हा रोग झॅन्थोमोनास सिट्री या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू मुख्यतः पानं, डहाळ्या आणि झाडांच्या फांद्या यांच्यावर टिकून राहतो व वाऱ्यामुळे आणि पावसामुळे याचे प्रसारण होते. याशिवाय किडे, कापणीचे अवजार, दूषित कापणी यामुळे सुद्धा पसरतो. जून ते सप्टेंबर या काळात ढगाळ वातावरण अधिक असते. त्यामुळे या काळात खैऱ्या राेगाची तीव्रता अधिक असते, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
या उपाययाेजना करा
खैऱ्यामुक्त रोपवाटिकेतून रोपांची निवड करावी. झाडांच्या राेगयुक्त डहाळ्यांची उन्हाळ्यात छाटणी करून त्या नष्ट कराव्या. सुरुवातीला काॅपर ऑक्सिक्लोराईड किंवा बोर्डेक्स मिक्चर आणि स्ट्रेप्टोसायक्लीनची तीन ते चार वेळा प्रत्येक महिन्यात फवारणी करावी. कडूलिंबाच्या ढेपीचे मिश्रणाची फवारणी करावी किंवा शिंपडावे. प्रत्येक झाडाची छाटणी केल्यावर अवजार सोडियम हायपोक्लाराईड द्रावणाने निर्जंतूक करावे. छाटणी केल्यावर फांद्या लगेच जाळाव्यात.
नवीन आलेल्या पालवीवर योग्यरित्या फवारणी करावी व फवारणी संपूर्ण झाडावर होत असल्याची खात्री करावी. पाने पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने खैऱ्या रोगाच्या संसर्गाला मदत होते. त्यामुळे नवतीवर कीटकनाशकाद्वारे पोखरणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. इतर हंगामात व अवकाळी पावसाच्या अधूनमधून सरी आल्यास अतिरिक्त फवारणी करावी आदी उपाययाेजना डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने सुचविण्यात आल्या आहेत.