रेल्वेगाड्या वाढताना दलाल अन् असामाजिक तत्त्वांचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:49 PM2020-09-16T21:49:31+5:302020-09-16T21:53:13+5:30
रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पूर्वी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक काम असल्यामुळे प्रवासी प्रवास करीत आहेत. रेल्वेगाड्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. याचा फायदा रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल घेत आहेत. बनावट आयडी तयार करून ते प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन प्रवाशांची लूट सुरू आहे. मंगळवारीच रेल्वे सुरक्षा दलाने एका दलालाला अटक करून त्याच्याकडून रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. अजूनही शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु असून रेल्वे सुरक्षा दल दलालांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत असताना असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. प्रवाशांची दिशाभूल करून ते त्यांची लूट करीत आहेत. चार दिवसांपूर्वी एका असामाजिक तत्त्वाने तिकिटाची नोंद करायची असल्याचे सांगून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे तिकीट रद्द करून त्यांच्या तिकिटांची रक्कम पळविली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्र्ग पोलिसांनी असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आरक्षण कार्यालयात हवी पोलिसांची ड्युटी
आरक्षण कार्यालयात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग असते. गर्दीचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्व प्रवाशांचे पाकीट, महागडे मोबाईल चोरी करतात. परंतु रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस आरक्षण कार्यालयात ड्युटीवर राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे आरक्षण कार्यालयात आरपीएफ जवान, लोहमार्ग पोलिसांची ड्युटी लावण्याची गरज आहे.