उपराजधानीचे दाहक वास्तव; कोरोनाचे रुग्ण मरणाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 10:15 AM2021-03-23T10:15:28+5:302021-03-23T10:16:58+5:30
Nagpur News कोरोनाबाधितांच्या खाटा फुल्ल झाल्याचे कारण देत सोमवारी रात्री मेयो, मेडिकलने हात वर केले. यामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला न्यावे कुठे, हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांच्या खाटा फुल्ल झाल्याचे कारण देत सोमवारी रात्री मेयो, मेडिकलने हात वर केले. यामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला न्यावे कुठे, हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्ण मरणाच्या दारात पोहचल्याचे उपराजधानीचे दाहक वास्तव समोर आले आहे.
५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास रुग्णाला मेयोच्या कोविड कॅज्युल्टीमध्ये आणले. परंतु येथील डॉक्टरांनी बेड नसल्याचे कारण सांगून मेडिकलमध्ये पाठविले. मेडिकलच्या डॉक्टरांनीही तेच कारण देत मेयोत जाण्यास सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी मेयोतूनच येथे पाठविले असे सांगितल्यावर डॉक्टरांनी सुरक्षा गार्डला बोलावून बाहेर काढले. यामुळे नातेवाईकांनी पुन्हा मेयो गाठले. तेथील एका डॉक्टरांनी सांगितले, कोरोनाच्या ६०० खाटांपैकी ५४० खाटा भरल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्टाफ दिला नाही. यामुळे खाटा वाढविणे शक्य नाही. मागील दोन तासापासून कॅज्युल्टीसमोर कोरोनाचे आठवर गंभीर रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. रात्रीचे १२ वाजले असताना रुग्णाला भरती करण्यात आले नव्हते. रुग्णाचे बरे-वाईट झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-