महागाई, भ्रष्टाचाराले ‘घेऊन जा गे मारबत’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 08:39 PM2018-09-10T20:39:28+5:302018-09-10T20:52:09+5:30
‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजतागायत कायम आहे. परंतु आता बडग्यांचे विषय बदलले आहेत. ते आता राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले आहेत. ते सरकारसाठी संकेत, संदेश देणारे ठरत आहेत. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून अच्छे दिन कधी येणार असा सवाल करणारे बडगे, आता सत्ताधाऱ्यांना अच्छे दिन पाहिजे असेल तर महागाई, भ्रष्टाचाराला लवकर ‘बाय बाय करा’, असा इशारा देत आहेत. पोळ्याच्या पाडव्यानिमित्त सोमवारी निघालेल्या नागपुरातील ऐतिहासिक मारबत उत्सवातून बडग्याच्या माध्यमातून नागपूरकरांनी सरकारला जणू हाच संकेतवजा इशाराच दिला गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजतागायत कायम आहे. परंतु आता बडग्यांचे विषय बदलले आहेत. ते आता राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले आहेत. ते सरकारसाठी संकेत, संदेश देणारे ठरत आहेत. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून अच्छे दिन कधी येणार असा सवाल करणारे बडगे, आता सत्ताधाऱ्यांना अच्छे दिन पाहिजे असेल तर महागाई, भ्रष्टाचाराला लवकर ‘बाय बाय करा’, असा इशारा देत आहेत. पोळ्याच्या पाडव्यानिमित्त सोमवारी निघालेल्या नागपुरातील ऐतिहासिक मारबत उत्सवातून बडग्याच्या माध्यमातून नागपूरकरांनी सरकारला जणू हाच संकेतवजा इशाराच दिला गेला.
ढोल, ताशांबरोबरच डीजेचा तुफानी गजर... पिवळ्या, भगव्या, गुलाबी गुलालाची मुक्त उधळण... त्यावर मनसोक्त थिरकणारी बेधुंद तरुणाई... आणि जागनाथ बुधवारीपासून इतवारी, गांधीबाग, महाल भागातील रस्त्यांवर नागपूरकरांची झालेली अमाप गर्दी, त्यातून महागाई, भ्रष्टाचार, रोगराईला ‘घेऊन जा गे मारबत’ असे आवाहन करणारे मंडळाचे कार्यकर्ते असा एक भव्य माहोल मारबत, बडग्या उत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला आला. जागनाथ बुधवारी येथून निघालेली पिवळी मारबत आणि इतवारीच्या बारदाणा मार्केटमधून निघणारी काळी मारबत यांचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर ऐतिहासिक मिरवणूक निघाली. या मारबतीसोबतच सामाजिक संदेश देणारे बडगे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी बडग्यांनी महागाई, इंधनदरवाढ, मनपाचा भ्रष्टाचार, नीरव मोदी, बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देणारे नेते, मनपाचा आरोग्य विभाग, स्क्रब टायफस हा जीव घेणारा कीडा, ओसीडब्ल्यू, एसएनडीएल, महिलांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे आमदार राम कदम यावर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत पहिल्यांदाच ‘भुरी मारबत’ सहभागी झाली होती. जी पत्नी पीडित पुरुषांवर महिलांकडून होत असलेल्या कायद्याच्या दुरुपयोगाबद्दल भाष्य करीत होती. भारतीय कुटुंब वाचविण्याचे आवाहन करीत होती.
वेगळ्या विदर्भाची हाक, हलबांना द्या साथ
चार वर्षापूर्वी वेगळा विदर्भ करू असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक जवळ आल्याचे संकेत देत विदर्भ क्रांती दल बडग्या उत्सव मंडळ, जुनी मंगळवारी यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची हाक दिली आहे. हलबा समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा साथ देण्याचे आवाहन केले आहे.
मंदिरांना तोडणारी मुगलशाही थांबवा
हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर न्यायालयाच्या निर्णयावरून उद्ध्वस्त करण्याचे काम प्रशासन करीत आहे. असा अत्याचार मुगल साम्राज्यात हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानावर होत होता. शासनाने यात दखल घेऊन प्रशासनाची ही मुगलशाही थांबवावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती, मस्कासाथ यांनी केली. मंदिर तोडणाऱ्या मुगलशाहीचा, महागाईचा आणि अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा बडग्या त्यांनी काढला होता.
भुऱ्या मारबतीला विवाहित पुरुषांचे साकडे
श्रद्धेय असणारी पिवळी मारबत, कुप्रथेला घेऊन जाणारी काळी मारबत बरोबरच विवाहित पुरुषांना कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी जेंडर इक्विलिटी फाऊंडेशनने भुरी मारबत काढली होती. महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यामुळे भारतीय कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. दर ९ मिनिटाला एक विवाहित पुरुष आत्महत्या करीत आहे. महिलांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारीचा विवाहित पुरुष आणि कुटुंब शिकार ठरत आहे. विवाहित पुरुषांचे भेदक वास्तव्य दर्शविणाऱ्या भुरी मारबतने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्क्रब टायफसचा लाल बडग्या
स्क्रब टायफस, डेंग्यू या जीवघेण्या आजाराची दहशत लोकांमध्ये आहे. बडग्या उत्सव समितीने स्क्रब टायफसचा लाल बडग्या काढून, स्क्रब टायफसला घेऊन जा गे मारबत असे आवाहन केले. मनपाचा भ्रष्टाचारी आरोग्य विभाग, ओसीडब्ल्यू, एसएनडीएलही टार्गेट होते. भालदारपुरा येथील बाल उत्सव बडग्या मंडळाने बडग्याच्या माध्यमातून मनपाच्या आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारावर लक्ष वेधले. तर शिवशक्ती मंदिर अॅक्शन कमिटी व सार्वजनिक बडग्या उत्सव मंडळातर्फे बांगलादेशी घुसखोरांना शरण देणाºया नेत्यांचा बडग्या काढला. ओसीडब्ल्यू, एसएनडीएलकडून जनतेची होत असलेली लूट थांबवा, याकडे बडग्याच्या माध्यमातून लक्ष वेधले. तर शिवशक्ती बाल बडग्या उत्सव मंडळ गंजीपेठ यांनी मनपातून ठेका पद्धती बंद करावी, बेरोजगारी संपवावी, याकडे लक्ष वेधणारा बडग्या काढला.
नीरव मोदीला घेऊन जागे मारबत
बालमित्र बडग्या उत्सव मंडळ, तेली समाज गंजीपेठ यांनी पीएनबीच्या भ्रष्टाचारावर लक्ष वेधत नीरव मोदीचा बडग्या काढला. सामान्य जनतेच्या पैशांची लूट करून विदेशात पळणाºया नीरव मोदीला घेऊन जा गे मारबत म्हणून त्याच्या नावाने बोटे मोडली.
अच्छे दिन हवे का?
युवाशक्ती बडग्या उत्सव मंडळ, लालगंज खैरीपुरा येथून निघालेल्या बडग्याने सत्ताधाºयांनाच अच्छे दिनचे आमिष दाखविणारा बडग्या काढला. चार वर्षात अच्छे दिनचे आमचे स्वप्न भंगले आहे. आता सत्ताधाऱ्यांना पडलेले स्वप्न भंगवायचे का? असा सवाल बडग्याच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपाने काढला दारुड्यांचा बडग्या
भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढलेला बडग्या आश्चर्यचकित करणारा ठरला. जनतेला भेडसावणाऱ्या समस्येकडे लक्ष न वेधता भाजपाने दारुड्यांचा बडग्या काढून काय संदेश दिला, हे अनेकांच्या पचनी पडणारे नव्हते. या बडग्यासोबत कचरा करणारा कनक रिसोर्सेसचा बडग्या असेही लिहिले होते.
राम कदम हाय हाय...
संग्राम बडग्या उत्सव मंडळातर्फे महिलांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांचा बडग्या काढण्यात आला होता. राम कदम हाय हाय, राम कदमला घेऊन जा गे मारबत अशा घोषणा मंडळाचे कार्यकर्ते देत होते.
स्मार्ट सिटीत वेश्या वस्ती
शहरात लवकरच स्मार्ट सिटी होणार असा प्रचार सुरू आहे. या स्मार्ट सिटीत धान्य बाजार, भाजीबाजार हे शहराच्या बाहेर अन् वेश्या वस्ती शहराच्या मध्यभागी कशी? अशी विचारणा प्रशासनाला करणारा बडग्या श्री बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळ, मासुरकर चौक यांनी काढला होता.
पिवळी मारबत श्रद्धेय
तऱ्हाणे तेली समाजातर्फे जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत ही नागरिकांच्या श्रद्धास्थानी आहे. या मारबतीला देवीचा दर्जा दिला आहे. तिची कृपा असली तर रोगराई, संकटापासून आपण मुक्त राहू, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच आपल्या चिमुकल्या मुलांना तिच्या छातीशी लावून तिचा आशीर्वाद घेण्यासाठी पिवळ्या मारबतीसमोर अनेक नागरिकांनी गर्दी केली. ही मारबत आपल्यावर सगळेच नागरिक तिला नमस्कार करण्यासाठी भक्तीभावाने समोर येत होते.