महागाईचे ‘फटाके’
By admin | Published: October 21, 2014 12:56 AM2014-10-21T00:56:43+5:302014-10-21T00:56:43+5:30
कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या फटाक्यांच्या (फॅन्सी फटाके) मागणीत वाढ झाली आहे.
किमतीत १० टक्क्यांनी वाढ : चायना फटाक्यांची किंमत दुप्पट
नागपूर : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या फटाक्यांच्या (फॅन्सी फटाके) मागणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी विविध प्रकारात चायना फटाके आले आहेत. परंतु दिवाळीच्या तोंडावर अनेक ठोक विक्रेत्यांकडे फार कमी साठा राहिल्याने त्यांनी फटाक्याची किंमत दुप्पट केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळीला आता काहीच दिवस राहिल्याने फटाक्यांच्या दुकानात बच्चेकंपनीबरोबर पालकांचीही गर्दी दिसू लागली आहे. सुमारे १९५० पासून भारतात चीनमधून फटाक्यांची आयात होत आहे. ‘चायना क्रॉकर्स’ फटाके त्या काळात आपल्याकडे प्रसिद्ध होते. आता हेच फटाके ‘पायली’च्या नावाने ओळखले जात आहेत. सध्या बाजारात १ इंचाच्या पायलीपासून ते ४ इंचच्या पायलीपर्यंत फटाके बाजारात उपलब्ध आहेत. आकाशात विविध रंगांची उधळण करणाऱ्या या फटाक्याची किंमत १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आहे. यासोबतच ‘सेव्हन शॉट ते ‘वन थाऊझंड शॉट’ फटाका उपलब्ध आहे. याची किंमत १५० रुपयांपासून ते १० हजार रुपयापर्यंत आहे. यात १२० शॉट असलेल्या ‘मस्का चस्का’ फटाक्याला दरवर्षी मोठी मागणी असते.
चायना फटाक्यांमध्ये यावर्षी ‘गोल्डन येलो’ या फटाक्यात व्हिसलिंग करीत पिवळ्या रंगात अनार जळते. ‘स्काय एंगल टू इन वन’ यात जमिनीवर अनारसारखे वेगळ्या रंगात जळत असताना त्याच वेळी आकाशात दुसऱ्या रंगाची उधळण करते. ‘चायना बॉन्टी क्रकलिंग’ हा फटाका विविध आवाज करीत आकाशात झेपावतो. ‘बुलेट ट्रेन’ यात मध्यम आकाराची पायली असून एकाच वेळी बुलेट ट्रेनसारखा आवाज करीत १०० शॉट निघतात. ‘एरियल मल्टी एव्हनलाँच’ यात एकापाठोपाठ २४० शॉट आकाशात विविध रंगांची उधळण करतात. ‘मायाजाल’, ‘चटाचट ज्युरासिक पार्क’ व ‘गिल्टरिंग’ हे फटाके विविध आवाज करीत जमिनीवर फुटतात. हे सर्व फटाके ६० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रॉकेटमध्ये ‘मिसाईल रॉकेट’ हे यावर्षी लाल आणि हिरव्या रंगात आले आहेत. (प्रतिनिधी)
लवंगी, भूईचक्र, फुलझड्यांचेही चाहते
चायना व आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ झाली असली तरी लवंगी, भूईचक्र, अनार, टिकल्या व फुलझड्यांशिवाय दिवाळीचा आनंदच साजरा होत नसल्याने हे फटाकेही आवडीने फटाकाप्रेमी घेत असल्याचेही दिसून येत आहे. चायना फटाक्यांमध्ये पटक बॉम्ब (पॉपपॉप), पिंगपाँग बॉल, माचीस, पेन्सील, बंदूक आणि त्याच्या गोळ्यांना बच्चेकंपनीकडून मोठी मागणी असते. परंतु मागणीच्या तुलनेत साठा कमी असल्याने अनेक ठोक विक्रेत्यांनी त्याची किंमत दुप्पट केली आहे.
कच्चा माल महागला
चांडक फटाका कंपनीचे मालक व नागपूर फायर वर्क्स डीलर असोसिएशनचे अशोक गुलाबचंद चांडक यांनी सांगितले, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागील कारणे म्हणजे मजुरी, वाहतूक आणि कच्चा माल आदींच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ. यातच फटाक्यांमध्ये वापरत असलेले पोटॅशियम क्लोरेट हे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून येते. यातही प्रचंड वाढ झाल्याने किमती वाढल्या आहेत.