महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:32+5:302021-09-08T04:12:32+5:30

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने आधीच गरीब व सर्वसामान्य त्रस्त असताना कोरोना काळात आणि नंतर सर्वच जीवनावश्यक ...

Inflation poured oil; Home budget went bad! | महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!

Next

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने आधीच गरीब व सर्वसामान्य त्रस्त असताना कोरोना काळात आणि नंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वांचे घरातले बजेट बिघडले आहे. कोरोनाकाळात काहींची नोकरी गेली तर अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहेत. त्यातच निरंतर वाढणाऱ्या महागाईने सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे. सोबत वाढत्या शैक्षणिक खर्चाची त्यात भर पडली आहे. तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च कसा सांभाळायचा, हा गंभीर प्रश्न गृहिणींसमोर आहे.

कुटुंबाचा महिन्याचा खर्च दीडपटीने वाढला

खाद्यतेल, साखर, गूळ, गहू, तांदूूळ, सर्वच डाळी, चहापूड आणि घरगुती गॅस सिलिंडरसह सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. या वस्तू खरेदीसाठी महिन्याचा येणारा पाच हजार रुपयांचा खर्च सात ते आठ हजारांवर गेला आहे. त्या तुलनेत उत्पन्न तेवढेच आहे वा कमी झाले आहे. घरखर्च सांभाळताना सर्वांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाज्यांच्या वाढत्या दरानेही त्यात भर टाकली आहे. दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढल्याने महिन्याचा ३०० ते ४०० रुपयांचा खर्च वाढला आहे. गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्याने सर्वांना बजेटची चिंता सतावत आहे. तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च दीडपटीने वाढला आहे.

तूर डाळ ११५ ते १२० रुपये किलो

सात ते आठ महिन्यांपूर्वी तूर डाळ (उत्तम) ९६ ते १०० रुपये किलो होती. कोरोनाकाळात दर वाढतच गेले. सध्या चांगल्या दर्जाची तूर डाळ ११५ ते १२० रुपये किलो आहे. वाढत्या खर्चासोबतच अनावश्यक खर्च म्हणून अनेकांनी डाळ खरेदी बंद केली आहे. डाळीशिवाय वरण, अशी अनेकांच्या घरची स्थिती आहे.

अशी वाढली महागाई :

जानेवारीतील दर सध्याचे दर (प्रति किलो रुपयांत)

शेंगदाणा तेल १८० १७०

सोयाबीन तेल १६० १५५

शेंगदाणे १०० १२०

साखर ३५ ४०

साबुदाणा ५५ ६५

मसाले ३४० ३९०

चहापूड ५२० ५८०

तूर डाळ १०० १२०

मूग डाळ ११० १२५

उडीद डाळ १०५ १३०

हरभरा डाळ ७५ ८५

गॅस सिलिंडर ७४६ ९३६

पेट्रोल ९०.५५ १०७.०२

डिझेल ७९.५५ ९४.५२

सिलिंडर हजाराच्या घरात

घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती गृहिणींच्या चिंतेचा विषय आहे. दर महिन्यात दर वाढतच आहेत. दहा महिन्यात सिलिंडरच्या किमतीत २९० रुपयांची वाढ होऊन दर ९३६ रुपयांवर पोहोचले आहेत. अर्थात सिलिंडर हजाराच्या घरात आहे. दर कमी करण्याची गृहिणींची मागणी आहे.

दोन गृहिणींच्या प्रतिक्रिया :

दरदिवशी वाढणारी महागाई आता चिंतेचा विषय ठरला आहे. यावर सरकारने चिंतन करावे. स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर अतोनात वाढले आहेत. त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण आणावे.

-कोमल क्षीरसागर, गृहिणी.

उत्पन्न कमी तर खर्च जास्त, अशी बहुतांश घरची स्थिती आहे. अनावश्यक खर्च सर्व जण टाळत आहेत. सोबत भाज्यांच्या दराने कळस गाठला आहे. सर्वच वस्तू महागल्याने स्वयंपाकघराचा खर्च दीडपटीने वाढला असून आवर घालणे कठीण आहे.

-आशा बगवे, गृहिणी.

Web Title: Inflation poured oil; Home budget went bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.