२४ तासात स्मार्ट सिटीच्या निर्णयाची माहिती द्या : महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:36 PM2020-06-18T21:36:23+5:302020-06-18T21:38:40+5:30
कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माहिती आवश्यक कागदपत्रासह २४ तासात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माहिती आवश्यक कागदपत्रासह २४ तासात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी दिले.
नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कामाचा महापौरांनी आढावा घेतला. तथा स्मार्ट सिटीचे ‘इन कॅमेरा’ झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी स्मार्ट सिटीचे सर्व संचालक स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते. संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकर्डिंग करण्यात आले.
यावेळी एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकूर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी उपस्थित होते.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा गडबड होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे जर कोणतीही गडबड झाली तर त्यामुळे मनपाचे नाव बदनाम होईल, त्यामुळे नियमानुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणेच सर्वांची वागणूक असावी, अशी अपेक्षा यावेळी संदीप जोशी यांनी व्यक्त केली.