भाजयुमो कार्यकर्त्यांनी दिली विकास योजनांची माहिती : गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 09:47 PM2019-08-01T21:47:22+5:302019-08-01T21:48:12+5:30
भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाने समाजातील गोरगरिब नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना गॅस सिलिंडर, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या. या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पुणे येथून आलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी पात्र उभे करुन राज्यातील विकासकामांबाबत माहिती देण्यात आली.३० कोटी वृक्ष लागवड, भ्रष्टाचार मुक्त सरकार, प्लास्टिक बंदी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जलयुक्त शिवार, गरिबांना हक्काची घरे या सर्व योजनांसंदर्भात या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी कलावंतांनी मतदान हा सर्वांचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. पथनाट्यात विनोद वनवे, शैलेश शेलार, महेश आंबेकर, दिनेश इंगोले, हेमंत होनराव, ज्ञानेश्वर गुरव, शुभांगी आंबेकर, ऋतुजा किर्वे, सागर वकटे यांनी भूमिका वठविल्या.