अनुराग सिंह ठाकूर लाेकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हमध्ये मांडणार विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 09:45 PM2023-03-29T21:45:40+5:302023-03-29T21:46:20+5:30
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर येत्या रविवारी, २ एप्रिल २०२३ रोजी नागपूर दौऱ्यावर येत असून, ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील लाेकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हमध्ये ते बोलणार आहेत.
नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर येत्या रविवारी, २ एप्रिल २०२३ रोजी नागपूर दौऱ्यावर येत असून, ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील लाेकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हमध्ये ते बोलणार आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी व लोकमत नागपूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही माध्यम परिषद आयोजित करण्यात आली आहे.
रामदासपेठेतील हाॅटेल सेंटर पाॅइंटमध्ये दुपारी अडीच वाजता या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन हाेईल. लाेकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहतील. विदर्भातील पत्रकारांना या परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे. एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, पंजाब केसरी व नवाेदया टाइम्सचे कार्यकारी संपादक आकु श्रीवास्तव, लाेकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनाेद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता काैशिक, न्यूज १८ लाेकमतचे संपादक आशुताेष पाटील या परिषदेत मते मांडणार आहेत.