माहिती, ज्ञान विज्ञानाचा वापर इतरांना दुखावण्यासाठी नको : पद्मभूषण माधव गाडगीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:11 AM2019-04-09T01:11:10+5:302019-04-09T01:13:38+5:30
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृती कारवायांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीवर चिंता व्यक्त केली. उद्योगांच्या अनधिकृती कारवायांद्वारे पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा प्रामाणिक अहवाल मांडणे आवश्यक आहे. माहिती, ज्ञान व विज्ञानाचा उपयोग इतरांना काबूत करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी करण्यात येऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृती कारवायांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीवर चिंता व्यक्त केली. उद्योगांच्या अनधिकृती कारवायांद्वारे पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा प्रामाणिक अहवाल मांडणे आवश्यक आहे. माहिती, ज्ञान व विज्ञानाचा उपयोग इतरांना काबूत करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी करण्यात येऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नीरीच्या स्थापना दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. याप्रसंगी सीएसआयआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर मांडे, सीएसआयआर-आयएमएमटीचे संचालक डॉ. सुधासत्व बसू, वातावरण बदल व कौशल्य विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. जे.एस. पांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. गाडगीळ यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. समाजात ज्ञानाचे महत्त्व मोठे आहे, पण ते सत्यावर आधारित असावे. देशातील उद्योगांनी नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे आवश्यक आहे. असंख्य अनधिकृत कामातून निसर्गाला हानी पोहोचविली जात आहे. देशातील वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट प्रामाणिकपणे मांडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी वस्तीनुसार नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाची गरज त्यांनी अधोरेखित केली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शासनात लोकसहभाग, सहकारातून आर्थिक उद्योग व समन्वयातून ज्ञानाचे व्यवस्थापन केले तरच विकास साधणे शक्य असल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले. डॉ. राकेश कुमार यांनी संस्थेच्या कामाबाबत माहिती दिली.
यादरम्यान ‘पर्यावरण टिकविण्याची आव्हाने’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये एमपीसीबीचे चेअरमेन सुधीर श्रीवास्तव, स्मार्ट सिटी, नागपूरचे सीइओ रामनाथ सोनवाणे, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव रंजन मिश्रा, सीएसआयआरचे संचालक डॉ. राकेश कुमार, सीपीसीबीचे माजी चेअरमन प्रा. एस.पी. गौतम, डॉ. विक्रम पत्तरकिने, वंदना मेहरा, राजुल पारिख, डॉ. एच.जे. पुरोहित, डॉ. अत्या कपले यांचा सहभाग होता.
भव्य विज्ञान प्रदर्शन
नीरीच्या स्थापना दिनाच्या दिवशी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र तसेच वेस्ट मॅनेजमेंट पार्कचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेलसह प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रदर्शन पाहण्यासाठीही मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित झाले होते. प्रदर्शनातील उत्कृष्ट विज्ञान मॉडेल्सला बक्षीस देण्यात आले. यावेळी सीएसआयआर-नीरीच्या डॉ. पी.व्ही. निधीश, डॉ. लीना देशपांडे, दीपक बडगे, आशुतोष मंडपे, रश्मी डहाके या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.