अमानुष! हवी ती भाजी न मिळाल्याने नागपुरात जन्मदात्रीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:42 AM2019-02-04T10:42:40+5:302019-02-04T10:44:43+5:30
घरात भाजीपाला नसल्यामुळे भाजी करून देण्यास नकार दिल्याने नागपुरात एका दारुड्याने त्याच्या वृद्ध आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरात भाजीपाला नसल्यामुळे भाजी करून देण्यास नकार दिल्याने एका दारुड्याने त्याच्या वृद्ध आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. ममताबाई सदाशिवराव हिंगे (वय ६०) असे मृत वृद्धेचे नाव आहे, तर सोनू ऊर्फ मिलिंद सदाशिव हिंगे (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सोमलवाड्यातील समृद्धी बौद्ध विहाराजवळ महात्मा फुले झोपडपट्टी आहे. तेथे सदाशिवराव हिंगे यांचे घर आहे. आरोपी सोनू हा त्यांचा मोठा मुलगा असून त्याचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते.
काही वर्षांपूर्वी त्याला दारूचे व्यसन जडले. तो दारूच्या इतक्या आहारी गेला की कामधंदा सोडून तो दारूच्या नशेत टून्न होऊन राहायचा. गॅरेज बंद पडल्याने नंतर त्याने बायको आणि आईवडिलांच्या भरवश्यावर दारूचा शौक पूर्ण करणे सुरू केले. त्यासाठी तो रोजच बायकोला मारायचा. त्याच्या व्यसनाला कंटाळून चार वर्षांपूर्वी त्याची बायको त्याला सोडून गेली.
तेव्हापासून तो वृद्ध आईवडिलांच्या कमाईवरच जगतो. त्याचे वडील सदाशिवराव सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि कशीबशी दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करतात. अनेकदा वेळेवर आणणे आणि वेळेवर खाणे, असेच चालते. शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास टून्न होऊन आलेल्या आरोपी सोनूने त्याच्या आईला वांग्याची भाजी बनवून मागितली. घरात काहीच नसल्याने आईने भाजी बनवून देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने वृद्ध आईला लाथाबुक्कयांनी मारहाण सुरू केली. ती मदतीसाठी याचना करीत असताना या नराधमाने तिच्या डोक्यावर जाडजूड कवेलू आदळून तिला ठार मारले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपीला दूर केले.
सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. शेजव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध ममताबाई यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पश्चात्ताप नाही !
बाजूलाच राहणारी मृत ममताबार्इंची बहीण प्रतिभा चुन्नीलाल कुंभलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली. जन्मदात्रीची हत्या करूनही त्याला कसलाही पश्चाताप नसल्याचे त्याचे रात्रीपासूनचे पोलीस ठाण्यातील वर्तन आहे.