नागपुरात नवविवाहित पत्नीची अमानुष हत्या; पतीच्या अनैतिक संबंधांची परिणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 02:49 PM2021-02-15T14:49:20+5:302021-02-15T14:49:40+5:30

Nagpur News नागपुरात अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने अमानुष हत्या केली.

Inhuman murder of newlywed wife in Nagpur; Consequences of a husband's immoral relationship | नागपुरात नवविवाहित पत्नीची अमानुष हत्या; पतीच्या अनैतिक संबंधांची परिणती

नागपुरात नवविवाहित पत्नीची अमानुष हत्या; पतीच्या अनैतिक संबंधांची परिणती

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयडीसी परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने अमानुष हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दिप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून तिची हत्या करून पसार झालेल्या आरोपीचे नाव अरविंद अशोक नागमोती (वय ३०) आहे.

मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला आरोपी एमआयडीसीत कामाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याच्या दिप्तीसोबत त्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे एमआयडीसीतील भीमनगरात भाड्याच्या खोलीत राहायचे. आरोपी अरविंद बाहेरख्याली वृत्तीचा आहे. लग्न झाल्यानंतरही तो त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात होता. त्याचे अनैतिक संबंध दिप्तीला दोन आठवड्यांपूर्वी माहित झाले. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचा वाद निर्माण झाला. रोजच त्यांच्यात कटकटी होऊ लागल्या. अनैतिक संबंध तोडल्याशिवाय घरात यायचे नाही, असा पवित्रा दिप्तीने घेतल्याने रविवारी सकाळपासून या वादाने भलतेच वळण घेतले. दोघांपैकी कुणीच नमते घ्यायला तयार नसल्याने त्यांच्यात दिवसभर भांडण सुरू होते. दरम्यान, दिप्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरच्यांनाही अरविंदच्या अनैतिक संबंधाची कल्पना दिली होती. त्यामुळे दोघांना समजावण्याच्या हेतूने दिप्तीचा भाऊ शुभम वामनराव ठाकरे (वय २०, रा. कुरखेडा), आरोपी अरविंदचे वडील आणि अन्य एक नातेवाईक रविवारी दुपारी नागपूरकडे निघाले.

आणि शंका खरी ठरली
प्रवासादरम्यान शुभमने दिप्तीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आरोपीने तिचे काही बरेवाईट तर केले नसावे, असे त्याला वाटत होते. सोमवारी पहाटे १.२० च्या सुमारास शुभम आणि त्याचे दोन नातेवाईक आरोपी राहत असलेल्या घरी पोहचले. तेव्हा दारात पाय ठेवताच त्याची शंका खरी ठरली. दिप्ती पलंगावर पडून होती. तिच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. आरोपी अरविंद आजुबाजुला दिसत नव्हता. त्यामुळे शुभमने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. दिप्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला. शुभमच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरविंदचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Inhuman murder of newlywed wife in Nagpur; Consequences of a husband's immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून