'व्हॅलेण्टाइन डे' च्या दिवशी नवऱ्याकडून पत्नीची अमानुष हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:32 AM2021-02-16T00:32:40+5:302021-02-16T00:34:44+5:30
Inhuman murder of wife, crime news अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नवविवाहित पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नवविवाहित पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दीप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे मृत वावाहितेचे व असून तिची हत्या करून पसार झालेल्या पतीचे नाव अरविंद अशोक नागमोती (वय ३०) असे आहे.
मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला संशयित आरोपी एमआयडीसीत एका कंपनीत वेल्डर म्हणून कामाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याच्या दीप्तीसोबत त्याचे ५ जानेवारीला लग्न झाले होते. लग्नानंतर हे दोघे एमआयडीसीतील भीमनगरात भाड्याच्या खोलीत राहायला आले. लग्नाला दोन आठवडे झाल्यानंतर आरोपी अरविंद बाहेरख्याली वृत्तीचा असल्याचा दीप्तीला संशय आला. लग्न झाल्यानंतरही अरविंद त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात असल्याची आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याची शंका दीप्तीच्या मनात घर करून बसल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचा वाद निर्माण झाला. रोजच त्यांच्यात कटकटी होऊ लागल्या. अनैतिक संबंध तोडल्याशिवाय घरात यायचे नाही, असा पवित्रा दीप्तीने घेतल्याने रविवारी सकाळपासून या वादाने भलतेच वळण घेतले. दोघांपैकी कुणीच नमते घ्यायला तयार नसल्याने त्यांच्यात दिवसभर भांडण सुरू होते. दरम्यान, दीप्तीने १३ फेब्रुवारीला आपल्या माहेरच्यांना अरविंदच्या अनैतिक संबंधाची कल्पना दिली. रविवारी सकाळी ११ वाजता दीप्तीचा भाऊ शुभम वामनराव ठाकरे (२०, रा. कुरखेडा) याने दीप्तीच्या मोबाइलवर संपर्क केला. यावेळी पती-पत्नीत कडाक्याचे भांडण सुरू होते. आरोपी पती दीप्तीला शिवीगाळ करत होता. दीप्तीने यावेळी तब्येत बरी नाही, तू घ्यायला ये, असे शुभमला म्हटले. परिस्थिती लक्षात घेत या दोघांना समजावण्याच्या हेतूने शुभम, आरोपी अरविंदचे वडील आणि अन्य एक नातेवाईक रविवारी दुपारी नागपूरकडे निघाले. प्रवासादरम्यान शुभमने दीप्तीच्या मोबाइलवर वारंवार संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचे काही बरेवाईट तर झाले नसावे, असेही त्याला वाटत होते.
अन् शंका खरी ठरली
सोमवारी पहाटे १.२० च्या सुमारास शुभम आणि दोन नातेवाईक आरोपी राहत असलेल्या घरी पोहोचले. दाराची कडी बाहेरून लावलेली होती. बाजूच्या खिडकीतून डोकावले असता दीप्ती पलंगावर पडून होती. तिच्या नाकातोंडाला रक्त लागले होते. पती अरविंद आजूबाजूला दिसत नव्हता. त्यामुळे शुभमने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. दीप्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला. शुभमच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल रेकॉर्डिंगने संशयकल्लोळ
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी अरविंद लग्नापूर्वी दुसरीकडे भाड्याने राहत होता. तेथील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अरविंदच्या मोबाइलमध्ये लग्नापूर्वीची त्याच्या प्रेयसीसोबतची रेकॉर्डिंग सेव्ह होती. ती दीप्तीने ऐकल्याने या नवविवाहित दांपत्यातील संशयकल्लोळ वाढला. नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दाट झाल्याने दीप्तीने टोकाची भूमिका घेत अरविंदला भंडावून सोडले. त्यामुळे त्याने दीप्तीची गळा आवळून हत्या केली. त्यापूर्वी त्याने तिला बेदम मारहाण केली असावी, असेही मृतदेहाच्या पाहणीतून वाटत असल्याचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
व्हॅलेण्टाइन डेलाच घात
अरविंदने दीप्तीची हत्या केल्यानंतर दाराला बाहेरून कडी लावली आणि नागपुरातून चंद्रपूरला पळून गेला. तेथे त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे समजते. त्याला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. यासंदर्भाने एमआयडीसीच्या ठाणेदारांशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी बोलणे झाले नाही. दरम्यान, ऐन व्हॅलेण्टाइन डेला हे आक्रित घडल्याने एमआयडीसी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.