लाेकमतच्या ‘रक्तदान महायज्ञात’ सखींचाही पुढाकार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:55+5:302021-06-18T04:06:55+5:30
नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच ...
नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच मंचच्या सदस्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नाेंदविला आहे. लाेकमततर्फे आयाेजित ‘रक्तदान महायज्ञ’ हेही सामाजिक जाणिवेचे राष्ट्रीय कार्य हाेय आणि या कार्यातही सखी मागे न राहता हिरीरीने सहभाग नाेंदवित आहेत. लाेकमत सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्याेत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त सखी मंचच्या हजारो सदस्यांनी रक्तदानाचा संकल्प केला आहे.
लाेकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जुलैपासून लोकमतच्यावतीने महाराष्ट्रभर ‘रक्तदान महायज्ञाचे’आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली. विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करील. आज पन्नास टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. शिवाय थॅलेसेमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर "लोकमत रक्ताचं नातं" या नावाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
कायम कुटुंब, चूल आणि मूल या चाैकटीत राहिलेल्या महिलांच्या सामाजिक जाणिवा अधिक व्यापक व्हाव्या, स्वत:साठी वेळ देऊन त्यांच्यातील स्वतंत्र विचारांना, सुप्त गुणांना नवे आयाम प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने ज्याेत्स्ना दर्डा यांनी २००० साली लाेकमत सखी मंचची स्थापना केली. हा सखींचा गाेतावळा वाढत राहिला आणि बघता बघता ताे महाराष्ट्र आणि गाेव्यात ४ लाखांच्या घरात पाेहचला.
सणवार असाे, व्रतवैकल्य असाे सखी मंचने विविध कार्यक्रमातून महिलांच्या भावनांना अर्थ दिला आणि त्यात तीही सुखावली. वेगवेगळे राेजगाराभिमूख वर्कशाॅप, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून सखींच्या आर्थिक सक्षमतेचा मार्गही सखी मंचने प्रशस्त केला. महिलांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतानाच त्यांच्या आराेग्यालाही केंद्रस्थानी ठेवले. त्यातून वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, जागृती, हेल्थ कॅम्पसह वेगवेगळ्या शिबिरांचे आयाेजन केले. देशविदेशातील सहलींचे आयाेजन करून त्यांच्या जीवनातील मळभ दूर केले. एवढेच नाही तर त्यांच्यात सामाजिक जाणिवेचीही रुजवात केली. ज्योत्स्ना दर्डा यांनी दिलेला वैचारिक वारसा सखी मंच तेवढ्याच ताकदीने पुढे चालवित आहे.