गैरधर्मीय महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:59+5:302021-04-26T04:07:59+5:30
नागपूर : मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, हे समाजाला दाखवून देणारी घटना रविवारी नारा घाट येथे घडली. एका गैरधर्मीय ...
नागपूर : मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, हे समाजाला दाखवून देणारी घटना रविवारी नारा घाट येथे घडली. एका गैरधर्मीय महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकटकाळात ही मानवता दिलासा देणारी ठरली.
जरीपटका येथील ८० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हते. एक नातेवाईक उपस्थित होता, पण त्याने एकट्याने अंत्यसंस्कार करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी जवळचे मित्र हाफीज अब्दुल बासित यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. बासित यांनी अन्य मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेचे प्रेत रुग्णवाहिकेत ठेवून नारा घाटावर नेले. दरम्यान, त्या महिलेचे काही नातेवाईकही घाटावर पोहचले. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुस्लिम बांधवांनी महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करताना जातीधर्माचा विचार केला नाही. त्यांनी केवळ माणुसकी जपून समाजाला धर्माच्या पलीकडे जाऊन वागण्याचा संदेश आपल्या कृतीमधून दिला. मानवधर्माचे पालन करणाऱ्या या मुस्लिम बांधवांमध्ये शेख रियाज, बबलूभाई, मो. वाहीद, जलीलभाई, खलीलभाई, मो. खालिद, अनवरभाई आदींचा समावेश होता.
--------------
सावधगिरीसोबत माणुसकीही महत्त्वाची
कोरोना काळात सावधगिरीने वागणे आवश्यक आहे, पण त्यासोबत माणुसकी जपणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संकटकाळात सर्वांनी एकमेकांची शक्य तेवढी मदत केली पाहिजे. माणुसकीचे पालन करणे हाच प्रत्येक धर्माचा उद्देश आहे, असे टेका शाही बाग कमिटीचे हाफीज अब्दुल बासित यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.