बहरीनमध्येही उभारणार हिंदू मंदिर, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:57 PM2022-02-10T12:57:47+5:302022-02-10T13:00:04+5:30
‘बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल् खलिफा यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा झाली.
नागपूर : मध्य पूर्वेतील बहरीन येथे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारे पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्यात येणार असून, त्या भागातील हा असा दुसरा देश बनणार आहे. बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल् खलिफा यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.
‘बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल् खलिफा यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा झाली. स्वामीनारायण मंदिरासाठी जमीन वाटप करण्याच्या निर्णयासह भारतीय समुदायाच्या गरजांकडे लक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार’, अशी भावना मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडली.
अबुधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे ब्रम्हविहारीदास स्वामी यांनी गेल्या काही वर्षांत बहरीनचे राजे हमद बिन इसा अल् खलिफा आणि प्रिन्स सलमान यांची अनेकदा भेट घेतली. अबुधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराचे अध्यक्ष अशोक कोटेचा यांनी या ऐतिहासिक निर्णयाबाबत बहरीन व भारत या दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभार मानले.
बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिरासाठी जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही दोन्ही देशांच्या नेत्यांचे आभार मानतो. बीएपीएस स्वामीनारायण संस्था अबुधाबीप्रमाणे बहरीनमध्येदेखील जागतिक सुसंवादासाठी अध्यात्मिक मंच प्रदान करेल. आम्ही बहरीनमध्ये एकात्मता, शांतता व सेवेचे स्थान निर्माण करण्यासाठी एकत्रितरित्या काम करण्यास उत्सुक आहोत, असे मत कोटेचा यांनी व्यक्त केले.
अबुधाबीतील मंदिर पुढीलवर्षी पूर्ण होणार
संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या पारंपरिक दगडी मंदिराचे बांधकाम अबुधाबी येथे सुरू असून, पुढीलवर्षी ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मंदिरात हाताने कोरलेले गुलाबी सॅंडस्टोन वापरण्यात आले असून, ते भारताची समृद्ध संस्कृती आणि इतिहास प्रतिबिंबित करतात. मंदिरात सात मनोरे व कळस आहेत. मंदिर किमान हजार वर्षे टिकेल अशा दर्जाचे हे बांधकाम आहे.
मंदिराच्या संकुलात अभ्यागत केंद्र, प्रार्थना सभागृह, वाचनालय, वर्गखोली, कम्युनिटी सेंटर, मजलिस, ॲम्फिथिएटर, खेळाचे क्षेत्र, उद्याने, पुस्तके आणि भेटवस्तूंची दुकाने, फूड कोर्ट आणि इतर सुविधा असतील, अशी माहिती कोटेचा यांनी दिली. अबू मुरेखा येथील मंदिराच्या ठिकाणी विटा स्थापन करण्यासाठी समाजातील सदस्यांचे स्वागत आहे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.