जल, पर्यावरण संवर्धनासाठी संघ घेणार पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:38 PM2018-09-03T14:38:46+5:302018-09-03T14:40:14+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. समाजाला सोबत घेऊन याबाबत देशपातळीवर चळवळ राबविण्याचा संकल्प यात घेण्यात आला. तसेच देशात प्रांतनिहाय रुपरेषा तयार करण्याची सूचनादेखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आंध्र प्रदेशमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह संघ परिवारातील व समाजातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यात उपस्थिती होती. या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शिक्षणक्षेत्राची स्थिती, कृषी, पर्यावरण यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन हा महत्त्वाचा विषय होता. केवळ शासनपातळीवर पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही. शाश्वत तोडग्यासाठी समाजाला घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. संघाकडून देशातील काही क्षेत्रात जलसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र याचा आता विस्तार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि जनतेला जोडण्यासाठी पाऊल उचलले गेले पाहिजे, असे ठरविण्यात आले. जल व पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय प्रकल्प राबविता येतील, तसेच कुठे जास्त प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर उपाययोजनांसाठी चळवळ उभारावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जैविक कृषी पद्धतीचा सुरू आहे प्रचार-प्रसार
मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात भोपाळ येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत जैविक कृषीपद्धतीच्या प्रचार-प्रसाराचा निर्णय झाला होता. यानुसार देशातील अनेक क्षेत्रात संघाचे प्रकल्प सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केरळ पुनर्वसनासाठी शक्य ती मदत करणार
सेवा भारतीच्या माध्यमातून घरांची डागडुजी, पुनर्वसन यासाठीदेखील संघाकडून मदत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत केरळमध्ये ३०० मदत शिबिरांच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. एक लाखाहून अधिक स्वयंसेवक मदतकार्याला लागले आहेत, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.